‘स्वाभिमान’ आलं धावून…’सैराट’ गेलं राहून..!

0
13217
ब्युरो रिपोर्ट : तेरसे बांबर्डेचा परशा आणि कर्नाटकातली आर्ची… दोघांनी लग्न केलं खरं, पण आर्चीच्या घरच्यांची ‘सुपारी’ घेऊन त्यांच्या मागं लागले ते ‘कर’नाटकी पोलीस. या सुपारीत कुडाळच्या पोलिसांनी भागीदारी केली, पण स्वाभिमानच्या एका जागृत कार्यकर्त्यामुळं ‘सैराट’ च्या दि एंडचा शेवट काही वेगळाच झाला. अशी एक फिल्मी सत्यकथा… तेरसे बांबर्डे इथल्या परशाचं कर्नाटकातल्या आर्चीबरोबर प्रेम जमलं. त्यांनी लग्नही केलं. कुडाळ पोलिसात त्याची रीतसर नोंद केली.  प्रेमाच्या वेलीवर सुखाचा संसार फुलत असतानाच ‘कर’नाटकी पोलीस विलन बनून आले. आर्चीच्या घरच्यांची सुपारी घेऊन ते थेट हजर झाले कुडाळ पोलिसात. आयती चालून आलेली संधी सोडतील तर ते कुडाळ पोलीस कसले? त्यांनीही मग ‘कर’नाटकी पोलिसाच्या सुपारीत आपला वाटा घातला आणि सुरु केला आपला ‘ड्रामा’. ‘स्पेशल छब्बीस’ च्या आठवणी ताज्या असतानाच आता  कुडाळ पोलिसच ‘सैराट’ झाले. ‘कर’नाटकी पोलिसांच्या ‘भागीदारी’ ला जागत त्यांनी मग या जोडप्याला बोलावून घेतलं आणि कोणतीही चौकशी न करता ते जोडपं ‘कर’नाटकी पोलिसांच्या स्वाधीन केलं. आर्ची आणि परशाला पोलीस कर्नाटकात घेऊन जायला निघाले. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकाला बेळगाव इथं पैसे घेऊन यायलाही त्यांनी सांगितलं. नातेवाईकाला यात कन्नडिगाचं काहीतरी ‘गौडबंगाल’ असल्याचा संशय आला. त्यांनी थेट हा प्रकार ‘स्वाभिमान’चे युवा कार्यकर्ते रुपेश बिडये यांच्या कानावर घातला. रुपेश यांनी लगेच ‘फिल्डिंग’ लावली आणि सावंतवाडी आंबोली रस्त्यावर ‘कर’नाटकी पोलिसांची गाडी अडवली. ‘स्वाभिमान’चा हिसका दाखवल्यावर कन्नडीगांची बोलती बंद झाली. जोडप्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मग कुडाळ पोलिसांनाही आपला स्वाभिमानी हिसका दाखवला. मग कुडाळ पोलीस ठाण्यातच कानडी आणि कुडाळ पोलिसांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं. खासगी गाडी घेऊन आलेल्या ‘कर’नाटकी पोलिसांचं भांड फुटलं. या जोडप्याला ‘आर्ची’ च्या नातेवाईकांकडं सोपवण्याची त्यांनी सुपारी घेतली होती आणि त्यात कुडाळ पोलिसांनी भागीदारी केली होती. याही आर्ची आणि परशाच्या ‘लव स्टोरी’त सैराटसारखाच दि एन्ड होणार होता. पण स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी या कहाणीचा संपूर्ण शेवटच बदलून टाकला. त्यांच्या सुखी संसाराचा दुसरा अंक चालू झाला पण ‘कर’नाटकी पोलिसांच्या ‘सुपारी’ला भाळून, ‘प्यार के दुश्मन’ बनलेले  आमच्या कुडाळचे पोलीस मात्र अखेरपर्यंत विलनच राहीले. आर्ची आणि परशाच्या लव स्टोरीला पुन्हा सैराट होण्यापासून वाचवणारा ‘स्वाभिमान’ मात्र या संपूर्ण स्टोरीचा एकमेव हिरो ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here