मालवण – कर्ली खाडी पात्रातील आंबेरी वाक्कर जुवा हे निसर्गरम्य व पर्यटन दृष्टया महत्वपूर्ण बेट वाळू उपशामुळे नष्ट होण्याची भीती आहे. तसेच येथील शेतकरीही उध्वस्त होण्याची भीती आहे. तरी या ठिकाणी खाडी पात्रात जाहीर करण्यात आलेले ई-३ व इ-२ या वाळू पट्ट्यांच्या लिलावास परवानगी देऊ नये. अशी मागणी आंबेरी वाकवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून वाळू उपशास विरोध दर्शवला आहे. आमदार नाईक यांनी सोमवार ३१ रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे. आंबेरी (वाकवाडी) येथील कोळवण ते आंबेरी प्लॉट क्र. ई-३ व इ-२ या वाळू पट्ट्याच्या समोर शेतक-याची दोन पिकी भात शेती व माड बागायत आहे. तसेच ह्या नदी पात्राच्या दोन्ही बाजूने आम्हां ग्रामस्थांची माड बागायत व शेती आहे. नदीच्या पलीकडच्या बाजूला चिपी हा भाग आहे. शेतक-यांची व बैलांची (जनावरांची) नदीतून ये-जा वाहतूक चालते. मात्र नदीत वाळू उपसा होडीचे नांगर व त्याला बांधलेली दोरी टाकलेली असते. त्यामुळे गुरांना पाण्यातून पोहत असताना दोरी पायाला अडकून धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांची लहान होड्यातून ये-जा असते. त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वाळू उपशामुळे येथील निसर्गरम्य बेट नष्ट होऊ शकते, पर्यटनाच्या दृष्टीने हे बेट आपल्या जिल्ह्यात महत्वाचे आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीचा गांभिर्याने विचार करावा. बेटावर सुमारे ३० एकर जमीन शेतक-यांच्या मालकीची आहे. नदीच्या दोन्ही बाजूच्या जमिनीत दोन पिक भात शेती उत्पन्न आहे. अल्प उत्पन्नावर आम्हां शेतक-यांची उपजिविका चालते, आम्हां शेतक-यांकडे भात पिक व माड बागायत या व्यतिरिक्त उपजिविकेचा दुसरा कोणताही पर्याय नाही.
तरी आमच्या जमिनीच्या सर्व्हे नंबर समोरील नदी पात्रातील वाळू लिलाव होऊ नयेत. आमच्या शेतजमिनीच्या व माड बागायतीच्या समोर वाळू वाळू काढण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात प्रतिभा वाक्कर, उमेश वाक्कर, किशोर वाक्कर, रामदास वाक्कर, सुनीता वाक्कर, जगदीश वाक्कर, रमाकांत वाक्कर यांच्यासह १९ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. २०१६ पासून जिल्हाधिकारी स्तरावर तक्रार अर्ज व निवेदने दिली असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.