एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची बालसंगोपन रजा

0
191
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. महिला कर्मचारी, पत्नी, हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशापुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने महिलांच्या भरतीला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्यामुळे महामंडळात वाहक पदासह इतर विविध पदांवर सध्या मोठ्या संख्येने महिला काम करीत आहेत. यात विशेष करुन ग्रामीण भागातील मुलींची संख्या अधिक आहे. एसटी महामंडळातील नोकरीमुळे या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत असल्याचे परिवहनमंत्री रावते म्हणाले.एसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती काळात ६ ऐवजी ९ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. असा निर्णय घेणारी देशातील एसटी महामंडळ ही एकमेव संस्था असून त्याच्याच पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करीत असताना या महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा आपल्या मुलांकडे लक्ष देणे शक्य होऊ शकत नाही. विशेषत: परिक्षांच्या वेळी मुलांना आपल्या पालकांची अधिक गरज असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रावते यांनी सांगितले. पत्नी हयात नसलेले पुरुष तसेच ज्या पुरुष कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्यात येईल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्ती महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही लागू असतील. मुलाचे वय १८ वर्षाचे होईपर्यंत ही रजा घेता येईल. एका वर्षात २ महिन्यांच्या कमाल मर्यादेत ही रजा घेता येईल. पहिल्या २ मुलांकरीता ही रजा घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here