कुडाळ-मालवण मधून दत्ता, सतीश की स्वतः राणे ? 

0
75
 मालवण : लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्यानं आता स्वाभिमान पक्ष विधानसभेसाठी जोरदार तयारी करतोय. गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी पाहता कुडाळ मालवण या अत्यंत महत्वाच्या मतदारसंघात वैभव नाईकांना शह देण्यासाठी दत्ता सामंत, सतीश सावंत की स्वतः राणे रिंगणात उतरतात, याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. २०१४ मध्ये कुडाळ मालवण मतदार संघात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे राज्यात जायंट किलर ठरले होते. पाच वर्षात आमदार वैभव नाईक यांनी तळागाळात जनसंपर्क कायम ठेवला. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात शिवसेनेला म्हणावे तसे मताधिक्य मिळाले नाही. मालवण तालुक्यात स्वाभिमान पक्षाला आघाडी मिळाली. पाच वर्षात स्वाभिमान पक्षाने मुसंडी मारत लोकसभा निवडणुकीत मालवण तालुक्यातून निलेश राणेंना आघाडी मिळवून दिली.  त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानला विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जरी स्वाभिमान पक्षाला मालवण तालुक्यात आघाडी मिळाली असली तरी कुडाळ तालुक्यात वैभव नाईक यांचेच वर्चस्व असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आले. त्यामुळे मालवणात आघाडी घेतलेल्या स्वाभिमान पक्षाने हुरळून न जाता कुडाळ तालुक्यात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिवसेनेला जास्त मताधिक्य घेण्यास स्वाभिमानने ब्रेक लावला असला तरी वैभव नाईक यांच्या विरोधात स्वाभिमान पक्षाचा उमेदवार कोण असणार याचीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे शेतकरी मेळाव्यात जाहीर केले. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठविण्याचे आवाहन देखील सावंत यांनी केले. सतीश सावंत यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर  स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत भावी आमदार अशा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या. स्वतः दत्ता सामंत यांनी जाहीर केले नसले तरी कार्यकर्त्यांनी मात्र भावी आमदार म्हणून सामंत यांच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तिकिटासाठी या दोघांच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार ? सावंत की सामंत ?की या दोघांनाही उमेदवारी न देता स्वतः नारायण राणे पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात उतरून झालेल्या पराभवाचा वचपा काढणार ? २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य अजूनही राणेंच्या मनात कायम आहे. त्यामुळे झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने राणेही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे सध्या कुडाळ मालवण मतदार संघात स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सतीश सावंत, दत्ता सामंत यांना तिकीट मिळणार ? की स्वतः नारायण राणे उतरणार विधानसभेच्या आखाड्यात उतरणार ? अशा चर्चानी सध्या सिंधुदुर्गचे राजकारण ढवळून गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here