हेत-मौदे नवीन रस्ता वाहनचालकांसाठी ठरतोय डोकेदुखी

0
189
वैभववाडी : दि १७ : आखवणे येथील अरुणा धरणाजवळून नव्याने करण्यात आलेला हेत मौदै रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. डोंगर खोदून नव्याने यावर्षी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर नेहमीच डोंगराची माती येत असल्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. रोजच्या या घटनांमुळे वाहनचालकही हैराण झाले आहेत.वैभववाडी तालुक्यातील आखवणे भोम येथे अरुणा नदीवर धरणाचा प्रकल्प झाला आहे. या प्रकल्पात हेत -मौदे हा जुना रस्ता गेला आहे. मौदेकडे जाण्यासाठी धरणाच्या बाजूने डोंगर खोदून नवीन रस्ता बनविला आहे. परंतु या रस्त्यावरून वाहतूक करणे वाहन चालकांसाठी धोक्याचे बनत आहे. कारण या मार्गावर थोडासा पाऊस झाला तरी डोंगराची माती रस्त्यावर येते. त्यामुळे वाहतूक ठप्प होते.या बेभरवशाच्या रस्त्यामुळे एसटी वाहतूकीवर परिणाम होत आहे. या रस्त्यामुळे काही वेळेस एसटी मौदे गावात न येता अर्ध्याहून माघारी परतते.त्यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खाजगी वाहनचालकही या मार्गावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. संबंधित विभागाने हा रस्ता निर्धोक करावा अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थातून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here