बांदीवडे खारभूमी योजनेच्या उघाडी नूतनीकरणाचे रखडवले ; ठेकेदार अनिस नाईक यांना काळ्या यादीत टाका ; हरी खोबरेकर यांची मागणी

0
205

मालवण : दि  १७ : आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आणलेल्या बांदिवडे खारभूमी योजनेच्या उघाडीचे नूतनीकरणाचे काम आतापर्यंत ४० टक्के होणे अपेक्षित होते. १२ महिने कामाची मुदत असून आतापर्यंत ५ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, या कामाचे ठेकेदार अनिस नाईक यांनी अद्यापही कामाला सुरुवात केली नाही. अनिस नाईक यांनी हे काम मुद्दामहून रखडवले असून या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.बांदिवडे खारभूमी योजनेच्या उघाडीचे नूतनीकरणाच्या कामाचे लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी भूमिपूजन केले होते. हे काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र आमदार वैभव नाईक यांना या कामाचे श्रेय मिळणार म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले अनिस नाईक यांनी मुद्दामहून काम रखडवून ठेवले. बांदिवडे खारभूमीचा बांध हा परिसरातील नागरिकांना, व विध्यार्थ्यांना शाळा कॉलेज मध्ये जाण्यायेण्यासाठी अगदी जवळचा मार्ग आहे. हे काम सुरु न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खारभूमी विकास उपविभाग कणकवलीचे उपविभागीय अभियंता श्री. हिंगमिरे यांनी अनिस नाईक यांना हे काम सुरु करण्यासाठी २५ जून रोजी नोटीस बजावली होती. मात्र त्याची कोणतीही दखल अनिस नाईक यांनी घेतली नाही. उलट या नोटीसला केराची टोपली दाखवली. परिणामी सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग सिंधुदुर्गनगरीचे कार्यकारी अभियंता श्री शिंदे यांनी ३ जुलै रोजी पुन्हा नोटीस बजावून निधी उपलब्ध असतानाही कामाची कार्यवाही का झाली नाही याचा खुलासा तात्काळ सादर करावा. अन्यथा निविदा अटीशर्तीनुसार दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाईल अशी नोटीस बजावली आहे. या नोटीसला १५ दिवस होत आले तरी काम सुरु करण्यात आले नसल्याने अनिस नाईक या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी हरी खोबरेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here