विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी आज निवृत्त होणार…!

0
82

मुंबई : दि. ३० : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी आज निवृत्त होणार आहे. ७४ वर्षांच्या अझिम प्रेमजी यांनी ५३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर कंपनीची धुरा आपल्या मुलाच्या म्हणजे रिषद प्रेमजी याच्या हाती सोपवली आहे. ३१ जुलैपासून रिषद प्रेमजी कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. अझिम प्रेमजी आपल्या कंपनीचे कार्यकारी संचालक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून संचालक मंडळात २०१४ पर्यंत कार्यरत राहणार आहेत. अझिम प्रेमजी यांचा जन्म २४ जुलै १९४५ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडिल हाशीम प्रेमजी हेदेखील एक उद्योगपती आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान, हाशीम प्रेमजी यांच्या वडिलांनी त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी भारतातच राहणे पसंत केले. त्यांच्या पश्चात कंपनीची धुरा अझिम प्रेमजी यांनी स्वीकारली. अझिम प्रेमजी यांनी कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून आपले शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा भारतात परतले आणि आपला व्यवसाय साभाळण्यास सुरूवात केली. सुरूवातील विप्रो ही कंपनी वनस्पती तेल आणि साबणाच्या व्यवसायात अग्रगण्य मानली जायची. परंतु १९७० मध्ये प्रेमजी यांनी अमेरिकन कंपनी सेंटिनल कंम्प्युटर कॉर्पोरेशन या कंपनीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर विप्रो आणि अझिम प्रेमजी यांनी मागे वळून पाहिले नाही. १९८० मध्ये प्रेमजी यांनी विप्रोला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर कंपनी कंम्प्युटर सोबतच सॉफ्टवेअर सर्विसही देऊ लागली. आज विप्रो ही देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. २००० मध्ये अझिम प्रेमजी यांना मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन द्वारे मानद डॉक्टरेट देण्यात आले. २००६  मध्ये त्यांना नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, मुंबई द्वारे लक्ष्मी बिझनेस व्हिजनरी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त २००९ मध्ये त्यांना मिडलटाउन, कनेक्टिकटमधील वेस्लेयन विद्यापीठाने मानद डॉक्टरेटने सन्मानित केले होते. तसेच २०१३ मध्ये लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार, म्हैसूर विद्यापीठाची मानद डॉक्टरेट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त २००५ मध्ये अझिम प्रेमजी यांना पद्मभूषण तर २०११ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here