सावंतवाडी : दि ३१ : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय आज बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच त्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी व जास्तीत जास्त कलाकारांना या महामंडळामध्ये समाविष्ट करावे यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. कारिवडे येथील हॉटेल मानस येथील महामंडळाच्या कोकण संपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महामंडळाचे पदाधिकारी मिलिंद माळी, नंदन वेंगुर्लेकर, महेश पाठारे, नितीन कारेकर, चंद्रहास राऊळ, मंजुनाथ फडके,भाई वेळणेकर, प्रथमेश गुरव प्रसन्ना कोदे यांच्यासह बैठकीला जेष्ठ व नवीन सभासद उपस्थित होते. या बैठकीत मुख्यत्वेकरून महामंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कसे पोहचेल व जास्तीत जास्त सभासद कसे होतील याबाबत चर्चा करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सभासद नोंदणी कार्यक्रम आखण्यात आला यामध्ये चार ऑगस्ट पासून कुडाळ, मालवण, सात ऑगस्टला कणकवली,वैभववाडी,देवगड तर 17 ऑगस्टला दोडामार्ग,सावंतवाडी,वेंगुर्ला तालुक्यातील सभासदांची नोंदणी व बैठकीचे वेळापत्रक लवकरच देण्यात येईल.तसेच १५ सप्टेंबर २०१९ नंतर जिल्ह्यात वेगवेगळे कलाक्षेत्राशी निगडित कार्यशाळा घेण्याचे ठरविण्यात आले आहे जेणेकरून नवीन कलाकारांना याचा फायदा होईल, त्याचे पण वेळापत्रक लवकरच निश्चित करण्यात येणार आहे या बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विकी केरकर यांनी केले.