आपत्ती व्यवस्थापनासाठी हवा नेदरलँडचा फॉर्म्युला..!

0
91

मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या महापुरामुळे लाखो लोक बाधीत झाले आहेत. या निमित्ताने आपल्याकडील एकूणच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती कुचकामी आहे याचा प्रत्यय आला आहे. देशभरात अशा प्रकारे प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे महापुराच्या आपत्ती उद्भवत असतात. त्यात, शेकडो लोक जीव गमावतात, हजारो कोटी रुपयांचे नुकसान होते. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानाचे बदलते पॅटर्न अशा आपत्ती अपरिहार्य असल्या आणि त्यावर मानवी नियंत्रण अशक्य असले तरी त्यापासून बचाव करणे शक्य आहे. त्यासाठी युरोपमधील नेदरलँड देशाप्रमाणे पूर व्यवस्थापन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे अतिशय उपयुक्त ठरु शकते. नेदरलँडचा बहुतेक भुभाग हा समुद्रपातळीच्या खाली असल्यामुळे या संपूर्ण देशाला त्यांच्या निर्मितीपासून प्रचंड महापुराला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे कालपरत्वे त्यांनी या पुराचा मुकाबला करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञानात बदल करणे सुरुच ठेवले होते. यासाठी त्यांनी पूर्वी शहरांच्यालगत असणार्‍या नद्यांच्या काठावर संरक्षक भिंती बांधण्यात आल्या होत्या. परंतु १९९० च्या दशकात आलेल्या महापुरांमुळे संरक्षक भिंती फोडून नद्यांचे पाणी शहरात घुसू लागले. त्यामुळे डच प्रशासनाने पूर रोखण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांनी इन्व्हेन्शन केले ते रुम फॉर रिव्हर्स या अनोख्या तंत्रज्ञानाचे. रुम फॉर रिव्हर्स अंतर्गत मुळ पात्राबाहेर पडणारे नदीचे पाणी शहरात येेण्यापासून न रोखता त्याला शहरात घुसू दिले जाते. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या काँक्रिट टँक, बास्केटबॉल ग्राउंड तसेच खुल्या ऑडिटोरिअमसारख्या ठिकाणी पुराचे ते पाणी साचण्यास सुरुवात होते. ही सर्व बांधकामे शहरांमधील पोल्डर्स म्हणजे ज्या ठिकाणी पुराचे किंवा पावसाचे पाणी साचून राहते अशा सकल भागात करण्यात आली आहेत. यासोबतच शहरांतील पार्कस, पार्किंग तसेच सार्वजनिक ठिकाणांचे बांधकाम अशा प्रकारे करता येते की अतिवृष्टी किंवा पुराचे पाणी इतरत्र न पसरता एकाच ठिकाणी साचून रहावे. ही सर्व बांधकामे रस्त्याच्या पातळीपासून खाली केली जात असल्यामुळे पुराचे पाणी रस्त्यांवरही राहू शकत नाही. पाउस नसताना या बांधकामांचा खेळ, कॉन्सर्ट किंवा कोणत्याही कारणांसाठी वापर केला जातो. नेदरलँडचा पूर व्यवस्थापनाचा हा फॉर्म्युला इतका कारगर ठरला आहे की गेल्या २० वर्षांपासून नेदरलँडमध्ये ढगफुटीच्या शेकडो घटना घडूनही शहरे पुराच्या पाण्याखाली बुडून जिवीत किंवा वित्त हानी होण्याची एकही घटना घडलेली नाही. आपल्याकडे अशा तंत्रज्ञानाचा अवलंब सर्व ठिकाणी अशक्य असला तरी निदान मोठ्या शहरांमध्ये तरी निश्‍चितपणे करता येउ शकतो. परंतु त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे केवळ आपत्ती येण्याची वाट पाहून नंतर लोकांना बोटीतून सुरक्षित ठिकाणी पोहचवणे किंवा फूड पॅकेट वाटणे, नुकसान भरपाई देणे या मानसिकतेतून प्रशासनाने बाहेर येण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here