कोकणातही आपत्ती झाली; कोकणाला गृहीत धरू नका, ठोस मदत द्या : अजित यशवंतराव

0
121

रत्नागिरी : सध्या राज्यभरात अतिवृष्टीने आणि महापुराने थैमान घातले आहे, सांगली आणि कोल्हापूरची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून आम्हा कोकणवासीयांच्या सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत, मात्र कोकणातही अतिवृष्टीने घरांची पडझड झाली आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीने घरे वाहून गेली आहेत, जमीन खचली आहे, माझ्या मतदारसंघातील कोंडवशी धरणाच्याही भिंतीला तडे गेल्याचं निदर्शनास आलं आहे. एकूणच कोकणची परिस्थिती ही अत्यंत गंभीर आणि भयावह आहे. मात्र राज्याच्या इतर भागांना मदत देताना सरकार जी तत्परता दाखवतं आहे तशी तत्परता कोकणच्या बाबतीत का दिसून येत नाही ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित यशवंतराव यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या इतर भागांप्रमाणे कोकणात माणसे राहत नाहीत का ? कोसळलेल्या घरांचे पंचनामे करण्यात दिरंगाई होते आहे, कित्येक ठिकाणी तर बाधित कुटुंब स्वतःच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत आहे किंवा स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. राज्य शासन नावाचा काय प्रकार असतो आणि आपत्ती निवारण कशाला म्हणतात हे अजून कोकणी जनतेला माहीत व्हायचं बाकी आहे. कोकणसोबत हा दुजाभाव कशासाठी ? कोकणात मोठ्या प्रमाणावर कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर वर्ग आहे कोकणी माणूस यंत्रणेला दोष न देता नशिबाला देतो, तो सहनशील आहे म्हणून इतकं दुर्लक्ष करणार ? कोकणी माणूस साधाभोळा असला तरी वेडा नाही, त्यालाही जीव आहे हे लक्षात घेऊन सरकारने आपत्ती निवारण निधीतून गोरगरिबांचे जे नुकसान झाले आहे ते भरून द्यावे व राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेची एक टीम ही कोकणात पाठवावी एवढीच कोकणच्या लोकांची मागणी आहे. त्याच बरोबर जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेच्या बैठकी याच्या आधी कधी झाल्या होत्या याची माहिती घेऊन, आपत्ती निवारण यंत्रणा सुसज्ज आहे की नाही याची खात्री करणेही गरजेचं आहे असे मत अजित यशवंतराव यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here