पालकमंत्र्यांच्या सूचनांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद…!

0
301

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोकणासंदर्भात केलेल्या सूचनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोकणातील घरे मातीची असतात. अशी घरे १०० वर्षांपर्यंत टिकतात, पण घरामध्ये पाणी गेल्यास ती १ ते २ आठवड्यात पडतात. अशा वेळी पाऊस नसेल तर त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. पूरग्रस्त भागातील अशा घरांचा पंचनामा करुन ती कोसळल्यास त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत केली. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेण्यास मान्यता दर्शवली आहे. तसेच पालकमंत्री केसरकर यांनी आणखीही कोकणच्या हिताच्या सूचना केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुमारे ३० ते ३५ किलोमीटर रुंद पट्ट्यात पूर आल्यास वाहून गेलेली जनावरे थेट समुद्रात जातात. त्यांचे अवशेष शवविच्छेदनासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोकणातील माणूस गुरांपासून मिळणाऱ्या नुकसान भरपाई पासून वंचित राहतो. तरी गावातील पोलीस पाटील, सरपंच व नजीतचा शेतकरी यांच्याकडून पंचनामा करून सदरची नुकसान भरपाई देण्यात यावी, झाडांच्या नुकसानीची जेवढी रक्कम रसकार देते तेवढे टक्केवारी नुकसान भरपाई म्हणून फलोत्पादनाचा जिल्हा म्हणून मान्यता असलेल्या कोकणातील जिल्ह्यात द्यावी, विशेषतः दोडामार्ग जिल्ह्यात स्थानिक जातीच्या केळीच्या बागांचे नुकसान झाले असून त्यासही नुकसान भरपाई द्यावी, पोल्ट्रीतील कोंबड्या वाहून गेल्यास फक्त ५ हजार रुपयांची नुकसानी मिळते. त्या ऐवजी जाहीर केलेल्या ५० हजार रुपये किंवा नुकसानीचे ७५ टक्के या निकषाने पोल्ट्रीला नुकसान भरपाई द्यावी, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वत्र भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. अशा ठिकाणी बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच  नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागत आहे. तरी भूस्खलनाचे प्रकार घडलेल्या ठिकाणी पूर्वी असलेल्या जमीनीवर झालेल्या बागायतीचे पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, तसेच घरांच्या पूनर्वसनाचा योग्य आराखडा बनवून त्याची किंमत शासनातर्फे देण्यात यावी, यंदाच्या पुरामुळे बाजारपेठांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुसकान झाले आहे. लघु उद्योगांना जाहीर केल्याप्रमाणे ७५ टक्के ५० हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत व्यापाऱ्यांनाही नुकसान भरपाई द्यावी,  कोकणातील विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे शेतीपंप पाण्याखाली न जाता पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतीच्या पंपाला नुकसान भरपाई द्यावी व विद्युत जोडणी विनामुद्य देण्यात यावी, कोकणातील अनेक नद्यांनी प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे जी जमीन वाहून गेली आहे त्यासाठी संरक्षक भित बांधण्याचा कार्यक्रम जलद गतीने राबवावा. गणपतीचा सणानिमित्त कोकणात अनेक चाकरमानी येतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोकणात उतरणारे अनेक घाट, गावरस्ते वाहून गेल्याने त्यांच्या दुरुस्तीचे कामे टेंडर पद्धतीने केल्यास १५ पेक्षा जास्त कालावधी लागेल. त्या ऐवजी टेंडर न काढता खात्याकडे असलेले कंत्राटदार किंवा मजूर सोसायटीकडून ही कामे सरु करण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांना द्यावी. जेणेकरुन गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या भाविकांना विना अडथळा गावी पोहचता येईल. शासनातर्फे लोकांना तांदूळ व गहू पुरविण्यात येत आहेत. त्यासोबतच रास्त भाव दुकानांच्य माध्यमातून तूरडाळ व साखर वितरण करण्यात यावे. तसेच अनेक गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत अशा गावांना केरोसिनचा पुरवठा करण्यात यावा अदी सूचना पालकमंत्री केसरकर यांनी केल्या. पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केलेल्या या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुरग्रस्तांच्या अनेक समस्या तातडीने सोडवणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here