आता ड्रायव्हरनाही पीएफ सुविधा…!

0
206

मुंबई : दि. २८ : मासिक किमान १५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींनाच भविष्य निर्वाह निधीची पीएफ सुविधा मिळत असली तरी यात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेनुसार चालक, नोकरचाकर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही पीएफचा लाभ मिळणार आहे. यासाठी संबंधित कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. किमान २० कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांच्या मालकांना पीएफ योजना राबवणे बंधनकारक आहे. पीएफची एकूण रक्कम २४ टक्के असून यासाठी कर्मचारी व आस्थापन यांच्याकडून प्रत्येकी १२ टक्के अंशदान दिले जाते. मात्र, पीएफसाठी पात्र होण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचा मासिक पगार किमान १५ हजार रुपये असणे आवश्यक आहे. कर्मचारी निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) गंगाजळी सध्या साडेदहा लाख कोटी रुपये आहे. मात्र, १५ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी – कामगार पीएफच्या सुविधेपासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने या वंचित घटकांना पीएफच्या कक्षेत सामावून घेण्याची योजना सरकारने आखली आहे. यामुळे चालक, नोकरचाकर, घरगडी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आदींना पीएफचा लाभ मिळू शकेल. यासाठी कामगार मंत्रालयाकडून कर्मचारी निर्वाह निधी कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. या बदलांनंतर कोणत्याही प्रकारच्या आस्थापनात पीएफचा दर व अंशदान किती असावे हे निश्चित करण्याचा अधिकार सरकारला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here