भारताचा धावांचा डोंगर…!

0
330

विशाखापट्टणम् : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. भारताचे सलामीवीर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि रोहित शर्माने केलेल्या खणखणीत १७६ धावांच्या जोरावर भारताने सात गडी बाद ५०२ धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताच्या फिरकीपटूंनी आपल्या जाळ्यात अडकवले. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाने पाहुण्या संघाला सुरुवातीलाच एकामागून एक धक्के दिले. त्यामुळे पाहुण्या संघाची अवस्था दिवसअखेर ३ बाद ३९ अशी झाली आहे. भारत अजूनही ४६३ धावांनी पुढे आहे. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा डीन एल्गर २७ धावा करून तर उप कर्णधार टेम्बा बावुमा दोन धावा करून नाबाद आहेत.भारताने ५०२ धावांचा डोंगर रचल्याने दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी दडपणाखाली दिसली. संघाची धावसंख्या १४ असताना एडिन मर्करमला त्रिफळाचीत करत अश्विनने भारताला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर ३१ धावांवर अश्विनने दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. केवळ चार धावा करून थेयुनिस डे ब्रून बाद झाला. पाठोपाठ जाडेजानेही आपल्या फिरकीची जादू दाखवत डीन पीएड्टला खातंही न खोलता माघारी पाठवले. त्यामुळे पाहुण्या संघाची अवस्था नाजूक बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here