‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट

0
452

नवी दिल्ली, दि.०७ : गोव्यात आयोजित होणाऱ्या ५०व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे ४१ सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे ५० वे वर्ष असून २० ते २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ७६ देशांचे एकूण २०० चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात ५ फिचर आणि १ नॉन फिचर असे एकूण ६ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इंडियन पॅनोरमात २६ फिचर आणि १५नॉन फिचर असे एकूण ४१ भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे. फिचर चित्रपटांमध्ये समीर विद्वंस दिग्दर्शीत आनंदी गोपाळहा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. स्त्री-शिक्षण आणि परदेशगमन या गोष्टींचा विचारही झाला नव्हता, अशा काळात गोपाळ विनायक जोशी या पोस्टमास्तराची १८ वर्षाची पत्नी आनंदी जोशी इंग्रजी भाषा शिकते. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला जाते. नेटाने अभ्यासक्रम पूर्ण करते. हेच देशातील पहिल्या महिला डॉक्टर  आंनदी जोशी या कर्तृत्ववान स्त्रीचे चरित्र या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शीत भोंगाचित्रपट हा फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शीत होणार आहे.  धर्म जीवनापेक्षा मोठा असतो की जीवन धर्मापेक्षा मोठे या सामाजिक विषयावर हा चित्रपट आधारीत आहे.  ‘माई घाट : क्राईम नंबर १०३/२००५हा अनंत महादेवन दिग्दर्शीत चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शीत होणार आहे. एका आईने पोलीस यंत्रणेविरूद्ध दिलेल्या लढयाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. यासोबतच आदित्य राठी व गायत्री पाटील दिग्दर्शीत फोटो प्रेमआणि तुझ्या आईलाहा संजय ढाकणे दिग्दर्शीत चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शीत होणार आहे. गणेश शेलार दिग्दर्शीत गढूळहा मराठी चित्रपट नॉन फिचर श्रेणीमध्ये प्रदर्शीत होणार आहे. वडिलांच्या मृत्युमुळे आई आणि मुलाच्या नात्याला आलेले दु:खदायक वळण व या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा सामना असे या चित्रपटाचे कथानक आहे. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट ठरलेला हेल्लारोहा गुजराती  चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये फिचर चित्रपटांतील तर नुरेहहा नॉन फिचर चित्रपटांतील स्वागताचा चित्रपट असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here