सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात संतप्त नागरिकांचा घेराव

0
375
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळपणाने कहरच केला आहे. डॉक्टरांची रिक्त पदे तसेच रुग्णालयातील अपुऱ्या सोईसुविधांमुळे अनेक तक्रारी होत्या. त्यातच आता रुग्णालयात वाढती अस्वच्छता यामुळे रुग्ण हैराण आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जर याठिकाणी रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल तर रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला होता. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचा कहर झाला असून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच रुग्णाना दिली जाणारी चादर आणि बेडशीट धुतलीच जात नाही. यामुळे बुधवारी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेबाबत माजगाव ग्रामस्थांनी वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांना घेराव घालत फैलावर धरले. यावेळी स्वच्छता करण्याचा ज्याला ठेका दिला आहे त्याची मुदत संपल्याने कपडे धुतले जात नसल्याची पाटील यांनी कबुली दिली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित डॉक्टरांना धारेवर धरले. रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीची बरेच दिवस झाले तरी सभा लागली नसून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आहे, याला जबाबदार कोण असे विचारत संतप्त ग्रामस्थांनी पाटील यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. यावेळी ग्रामस्थ व डॉ. पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जर याठिकाणी रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल तर रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर ठेकेदार घटनास्थळी उपस्थित होत स्वच्छतेच्या कामाला तात्काळ सुरुवात करतो असे ग्रामस्थांना  ठेकेदाराने आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here