कलेला चंदनस्पर्श देणारं अलौकिक व्यक्तिमत्त्व…राजमाता सत्वशिलादेवी..! ; ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चा विशेष वृत्तांत

0
1269

ब्युरो न्यूज  : सुंदरवाडी संस्थानच्या गौरवशाली परंपरेला इतिहासाच्या पानापानावर अजरामर केलं ते पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी. यात त्यांना साथ मिळाली ती आदरणीय राजमाता राणी सत्वशीलादेवी राजेभोसले यांची. कला, शिक्षण, परंपरा यांची गौरवशाली परंपरा  अखेरच्या श्वासापर्यंत जपणाऱ्या राजमातांची प्राणज्योत बुधवारी रात्री मालवली. आपल्या कार्यातून आणि विचारांमधून अजरामर असलेल्या राजमातांना सिंधुदुर्ग लाईव्हन वाहिलेली ही श्रद्धांजली…. 
हिरा हे असे रत्न आहे की ते कोठेही न्या ते आपल्या तेजाने, झळाळीने दिपवून टाकते. त्याची वाहवाच होते. असे अलौकिक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीला भोसले होय. बडोदा राजघराण्याचे कै. महाराजा प्रतापसिंहराव गायकवाड व कै. महाराणी शांतादेवीसाहेब यांच्या एकूण आठ मुलांपैकी तृतीय कन्या म्हणजे सरलाराजे अर्थात सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीला भोसले होय. राजमातांचा जन्म २ सप्टेंबर १९३५ मध्ये झाला. सावंतवाडी संस्थानचे लेफ्टनंट कर्नल शिवरामराजे भोसले यांच्याशी आठ डिसेंबर १९५१ रोजी त्यांचा विवाह होवून त्या सावंतवाडीच्या राणीसाहेब झाल्या. तिथपासून ते आजतयागत राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले यांनी बडोद्याच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड व पुण्यश्लोक बापूसाहेबमहाराज यांचा वारसा अगदी हिऱ्यासारखा तेजोमय ठेवला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला सावंतवाडी संस्थानातील लाखकाम कला फारच प्रसिद्धीला आली होती. थोडक्यात ती जगप्रसिद्ध झाली होती. ती कला राजाश्रय देवून राजघराण्याने जिवंत ठेवली होती. मात्र काळाच्या ओघात ही कला लुप्त होत असताना त्याला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे काम सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब झालेल्या राजमातांनी केलं. या कलेला राजाश्रय देत गांंजिफा, लाखकाम, मणीकाम, एम्ब्रोडरी इत्यादी कलांमध्ये विशेष लक्ष घातले. खरंतर सावंतवाडीतील चितारीवर्गाकडे असणारी लाखकाम कला आणि गंजिफाचे कलाप्रकार लोपवत चालले आहेत. हे राजमातांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः पुंडलिक चितारी नामक या कलाकाराकडून या कलेचे पारंपारिक बारकावे अवलोकून स्वतः शिकून घेतले. राजेसाहेबांच्या सहकार्याने सावंतवाडी लॅकर्स वेअर्स ही संस्था स्थापन केली. कलाकारांचा शोध घेवून त्यांनी ही कला तरुण पिढीला शिकवली. गंजिफांंचे पत्य तयार करण्यासाठी तसेच नवग्रहांसारखे गंजीफे शिकण्यासाठी देशभरात तसेच परदेशात दौरे केले. तयार केलेल्या कलाकृतींसाठी राजवाड्यातच त्यांनी शोरूम शॉपी सुरु केली. सावंतवाडीच्या चितार आळीतील जगप्रसिद्ध लाकडी खेळणी व्यवसाय नष्ट झालेल्या पंगारा वृक्षामुळे संकटात आल्यावर स्वतः राजमातांनी यात विशेष लक्ष घालून कागदी लगद्यापासून अशी खेळणी तयार करण्याचा पर्याय समोर आणला. सावंतवाडी  लॅकर्स वेअर्स संस्थेच्या माध्यमातून कलाकृतीची निर्मिती करत असताना पूर्वापारच्या कलेला फर्निचर निर्मितीची जोड दिली. बेल-बुट्ट्या पशु-पक्षी यांच्या कौशल्याचा वापर करून लाखकामाद्वारे आकर्षक फर्निचर बनविण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्यातील संशोधक वृत्तीमुळे अनेक नवे आकृतीबंध त्यांनी निर्माण केले. राशी गंजिफा, नवग्रह, चंगकांचन हे गंजिफा प्रकार त्यांनी सुरु केले. पत्यांचे संच, लॅम्प शेड, दागदागिन्यांकरिता आकर्षक रंगीत पेट्या, सतरंज संच, गुडफर यांची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर भरतकाम आणि मणिकामाचा अप्रतिम वापर करून पर्सेस, पिशव्या, शाली या देखील त्यांनी बनविल्या. त्यांनी जपलेल्या या कलेमुळे त्यांना राज्यपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सावंतवाडी  लॅकर्स वेअर्सला त्यांच्याचमुळे बेस्ट एक्स्पोर्ट अॅवॉर्ड तीन वेळा मिळाला. संस्थेने निर्माण केलेल्या कलाकृतींना अमेरिका, नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी, जपान, हॉंगकॉन आदी देशांमध्ये बाजारपेठ मिळाली. त्यानंतर राजमातांनी  लॅकर्स वेअर्स, विणकाम, एम्ब्रोडरीचे निष्णात कारागीर म्हणून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले. देश व राज्य पातळीवर महिला उद्योजकता संदर्भातील अनेक कार्यशाळा आयोजित केल्या. अनेक चर्चा सत्रात सहभागी झाल्या महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाबाबत ऑल इंडिया रेडीओ वरून सातत्याने भाषणे केली. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गरीब व गरजू महिलांना शिवणयंत्र पुरविण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला. गरीब व गरजू महिलांकरता लघुउद्योगाची स्थापना केली. त्यांच्या या योगदानाची दखल घेवून हस्त कलेतील कौशल्याबद्दल राज्य  पातळीवरील ५ पुरस्कारांनी त्यान सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराकरता त्यांचे तीन वेळा नामांकन करण्यात आले.  उत्तम कलाकृतींच्या निर्यातीबद्दल महाराष्ट्र राज्याची तीन परितोषिके त्यांनी प्राप्त केली. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सावंतवाडीच्या राणी जानकीबाईसाहेब सूतिकागृहाच्या अध्यक्षा होत्या. सावंतवाडी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या त्या संस्थापक कार्याध्यक्षा होत्या. दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षक प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा व विश्वस्त होत्या. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विश्वस्तपदाची धुरा सांभाळताना त्या १९८० पर्यत राजेसाहेबांच्या बरोबरीने कार्यरत राहिल्या. प्रत्यक्ष १९८० मध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होताच त्यांनी संस्थेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि समर्थपणे पेलली. जिल्हा सल्लागार मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या त्या माजी कार्याध्यक्षा होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य समाजकल्याण सल्लागार मंडळाच्या त्या सदस्या होत्या.
आपल्या कलाकुसरीन देशातच नव्हे तर जगभरात आपली ओळख निमार्ण केली ती सुंदरवाडी. या कलेला राजाश्रय देऊनच नव्हे तर स्वतः ती कला शिकून जनतेशी खऱ्या अर्थाने एकरूप झाल्या त्या राजमाता. त्यांचे हे कार्य, त्यांचे विचार इथल्या भूमीला नेहमीच नवी प्रेरणा देत राहतील. प्रत्येक कलाकुसरीत राजमातांची मायेची पाखर यापुढेही राहील. असं व्यक्तिमत्त्व एकदाच जन्म घेत. दरवळणाऱ्या चंदनासारखं आपल्या कार्यातून मात्र ते सतत आपल्यासोबतच राहत..सिंधुदुर्ग लाईव्ह परिवारातर्फे राजमातांना भावपूर्ण श्रद्धांजली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here