…तर विजबिले भरू देणार नाही ; व्यापाऱ्यांचा वीज वितरणला इशारा

0
677
मालवण : बाजारपेठेतील वीजपुरवठा सातत्याने खंडीत तसेच कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. नवीन विद्युत रोहित्र बसविण्याची कार्यवाही येत्या तीन दिवसात न झाल्यास तालुक्यातील कोणालाही विजबिले भरू देणार नाही असा इशारा संतप्त व्यापाऱ्यांनी दिला. 
बाजारपेठेतील वीज पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आले होते. मात्र त्यानंतरही सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने खंडीत वीज पुरवठ्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याने आज संतप्त व्यापाऱ्यांनी देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी अशोक सावंत, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये, उमेश नेरुरकर, नाना पारकर, नितीन वाळके, विजय केनवडेकर, रवी तळाशीलकर, बाळू तारी, विजय चव्हाण, भाऊ सापळे, अरविंद सराफ, नंदू गवंडी, उमेश शिरोडकर, परशुराम पाटकर, संजय गावडे, विद्या मेस्त्री, हर्षल बांदेकर, बाळू हुले, हितेंद्र हिर्लोस्कर, शैलेश पालव, ओंकार चिंदरकर, सूर्यकांत चव्हाण, हेमंत शिरपुटे, तुषार गावकर, रवींद्र टेबुलकर, स्वप्नील अंधारी यासह अन्य उपस्थित होते. 
यावेळी व्यापाऱ्यांनी वीज पुरवठा बंद राहिल्यास व्यापार कसा करायचा असा प्रश्न केला. विद्युत रोहित्र जुने लावताना केवळ रंगरंगोटी करत देखावा केला जात आहे. बाजारपेठेतील विद्युत रोहित्र तीन, चार वेळा बदलण्यात आले मात्र वीज पुरवठ्याची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे आणखी कितीवेळा विद्युत रोहित्र बदलणार असा प्रश्न श्री. तायशेट्ये, श्री. सावंत, श्री. नेरुरकर यांनी केला. महावितरणने ग्राहकांची फसवणूक करू नये. आम्ही बिले भरतो. तुम्हाला जर सेवा देता येत नसेल तर कार्यालय बंद करा असे नाना पारकर यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी वीज पुरवठा सुरळीत करा. आम्ही व्यापार बंद ठेवून आलोत. आजच्या आज विद्युत रोहित्र बसवा अन्यथा आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका श्री. सावंत यांनी घेतली.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आम्ही सहनशील आहोत म्हणून महावितरण आमच्यावर अन्याय करत आहे का असा प्रश्न श्री.तायशेट्ये यांनी केला. यावेळी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यासाठी तीन दिवसांची डेडलाईन देण्यात आली. अन्यथा तालुक्यातील एकाही ग्राहकाला वीजबिल भरू दिले जाणार नाही असा इशारा देण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here