जामसंडे पिरवाडीत गणेश विसर्जन पायवाटेच्या मुद्दावरून दोन गट आमनेसामने; दंगल नियंत्रण पथकाला पाचारण

0
566

देवगड : तालुक्यातील पिरवाडी येथिल वादग्रस्त पायवाटेवरून झालेल्या वादातून परस्पर विरोधी तक्रार दोन गटांकडून देवगड पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे .दोन्ही तक्रारीमधिल आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या वादग्रस्त पायवाटेच्या अनुषंगाने ही पायवाट गणेशविसर्जनाकरिता जाणारी पायवाट असल्याने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दंगल नियंत्रण पथक(आरसीपी) ११ जणांची तुकडी देवगडमध्ये दाखल होवून पिरवाडीकडे रवाना झाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदानंद सहदेव सारंग(वय-49, रा.पिरवाडी) यांनी वादग्रस्त पायवाट गणेशविसर्जनाकरिता साफ करण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली असता न्यायालयाच्या आदेशानुसार ही पायवाट गावातील लोकांनी साफ केली.त्यानंतर फिर्यार्दी हे आपल्या घरी जात असताना आरोपी तुकाराम बांदकर, महेश बांदकर, नागेश बांदकर हे आपल्या अंगणात उभे होते.त्यावेळी आरोपी तुकाराम बांदकर यांनी फिर्यादीच्या डोक्यावर दांडा मारून दुखापत केली व शिवीगाळ केली म्हणून फिर्यादीने देवगड पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली आहे.ही घटना 19 सप्टेंबर रात्रौ.8 ते 9 वा.च्या दरम्यान पिरवाडी येथे घडली.या घटनेतील आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोेलिस निरिक्षक सुधिर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरिक्षक पुनम आसवले करित आहेत. दुसऱ्या घटनेतील तक्रारीनुसार फिर्यादी नागेश कृष्णा बांदकर (वय-4२ रा.पिरवाडी) यांचे व आरोपी यांचे वादग्रस्त पायवाटेवरून बोलणे, चालणे नाही तसे वाकडीकपणा आहे.19 सप्टेंबर रात्रौ.9 च्या दरम्यान फिर्यादी नागेश बांदकर हे आपल्या घराच्या अंगणात बसले असता यातील आरोपी सुशांत आनंद येरम, सदानंद स.सारंग यांनी फिर्यादीच्या डाव्या हातावर काठीनं मारहाण करून दगडफेक करित दुखापत केली व यातील अन्य आरोपी रामचंद्र हिरनाईक, शैलेश सारंग, आतेश हिरनाईक, लक्ष्मण बांदकर, मनिषा सारंग, बाळकृष्ण मणचेकर यांची पत्नी यांनी गैरकायदा जमाव करून तेथिल दगड व काठ्या फिर्यादीच्या अंगणात फेकल्या.याविरूद्ध फिर्यादीने देवगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल करून या घटनेतील आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक सुधिर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरिक्षक पुनम आसवले करित आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.