कणकवली : सध्या एकंदर समाजाच्या वैचारिक परिस्थितीचा धांडोळा घेतला तर खूप उलथापालथ होत असलेली जाणवते. अशा काळात समाजात जे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी झटतात, त्यांनाच लक्ष केलं जातं. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा कित्येकांना मग संपविलं जातं. वैचारिक पातळीवर सुरू असणारी ही लढाई जीव घेईपर्यंत येऊन ठेपते. मात्र माणूस मेला तरी त्याचे विचार मरत नसतात. ते चिरकाल अविनाशी असतात. अशाच शाश्वत विचारांना ‘मोस्ट वेलकम’ करत विचार करण्याला भाग पडणारं नाटक म्हणजे ‘मोस्ट वेलकम’. देशपरिस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या या नाटकाचा सध्या कोकण दौरा सुरू असून आज या नाटकाचा प्रयोग सावंतवाडी येथे सुरू असणाऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनात प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे आणि प्रसिद्ध लेखिका संध्या नरे-पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री १०.०० वाजता संपन्न होणार आहे. तर उद्या दि. ९ मे रोजी या नाटकाचा प्रयोग कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे रात्रौ ठीक ७.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग पुरस्कृत निशिगंध, मुंबई आणि कलासाधना निर्मित ही वैचारिक नाट्यकलाकृती झोपेतून खडबडून जागं करते आणि विचार करायला भाग पाडते. या नाटकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सारी तरुणपिढी काम करतेय. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन सुनील हरिश्चंद्र यांनी केले असून यात सिमरन संगीता श्रीकांत, निहारिका स्मिताली राजदत्त, भक्ती भारती रमेश, ऋतिका माया संजय, ऋतिका माधुरी संतोष, संकेत सुवर्णा श्रीधर, विकास मंदा विठ्ठल, प्रणय मयुरी महेंद्र, भावेश वैशाली विलास, अमोल भारती अशोक, सुनील तारामती हरिश्चंद्र यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर प्रकाशयोजनेची जबाबदारी श्याम भारती गणेश आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी सुमेध सिद्धी सच्चिदानंद यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. तरी या वैचारिक कलाकृतीचा नाट्यरसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन दर्पण प्रबोधिनी चे अध्यक्ष आनंद तांबे, सचिव सुभाष कदम, उपाध्यक्ष नरेंद्र तांबे यांनी केले