कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याचीवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क कुडाळ या पथकाने गोवा दारूची वाहतूक करीत असताना चार चाकी वाहनासह रु. 9,78,000/- मुददेमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क कुडाळ जिल्हा सिंधुदूर्ग यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार दिनांक 7 मे रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पावशी मिटक्याचीवाडी येथे सापळा रचला होता. सदरवेळी गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणा-या टाटा कंपनीचे राखाडी रंगाचे सुपर एसच्या चारचाकी टेम्पो (क्र. एमएच-07/ पी-2647) या वाहनाला थांबवून तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित दारुने भरलेले 180 मिली मापाच्या 110 पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये 5280 सिलबंद बाटल्या असे 5,28,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल आढळला. तसेच वापरण्यात आलेल्या वाहनाची अंदाजे किंमत रु.4,50,000/- असा एकूण मिळून रु. 9,78,000/- असा मुद्देमाल जप्त केला.
गोवा मदयाची बेकायदेशीर वाहतूक करताना संतोष नारायण कुडतरकर (रा. माणगांव ता. कुडाळ ) याला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई यशवंत पवार, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर व व्ही. व्ही. वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदूर्ग यांच्या मागदर्शनाखाली निरीक्षक. ए. ए. पाडळकर, दुय्यम निरीक्षक श्री. ए. आर. जगताप यांनी कारवाई केली. सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, स.दु.नि. ल आर. डी. ठाकूर, जवान-नि-वाहनचालक एच. आर. वस्त, रणजित शिंदे, जगन चव्हाण यांनी मदत केली. तपास राज्य उत्पादन शुल्क कुडाळ निरीक्षक ए. ए. पाडळकर करीत आहेत.