पंतप्रधानांप्रमाणे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही मान राहिला पाहिजे | सेनेन भाजपाला सुनावलं

0
87

मुंबई : भाजपा नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून गुरुवारी आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यामध्ये रणकंदन माजले होते. बग्गा हे भाजपाच्या युवा शाखेचे नेते आहेत आणि पक्षाचे दिल्ली प्रवक्तेही आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर असून पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांना अटक केली होती. त्यानंतर बग्गा यांची सुटका करण्यात आली. यावरुन आता भाजपा नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरजार टीका केली. याबाबत आता शिवसेनेनेही भाष्य केले आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

“सत्तेची नशा फारच खतरनाक असते. ही नशा भल्याभल्यांना बरबाद करते असे महाभारत, पुराणकालापासून दिसत आले आहे. त्यामुळे निदान लोकशाही परंपरांत तरी सत्तेचा अमर्याद गैरवापर कोणी करू नये. दिल्लीतील भाजपाचे नेते तेजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केली. त्यावरून भारतीय जनता पक्षाला व्यक्तिगत स्वातंत्र्य, लोकशाही, पोलिसी गैरवापर याबाबत भलताच पुळका आला आहे. बग्गा यांना पंजाब पोलिसांनी पकडणे म्हणजे हुकूमशाही असल्याचे मत भाजपाच्या लोकांनी व्यक्त केले. पंजाबच्या पोलिसांच्या कृतीने धक्का बसला असून आणीबाणीसारखे वातावरण झाले आहे, अशी चिंता भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे. भाजपाची ही भूमिका आश्चर्याचा धक्का देणारीच आहे. करून करून भागले व देवपूजेला लागले, त्यातलाच हा प्रकार. बग्गा हे एक उपद्व्यापी गृहस्थ आहेत व त्यांनी भाजपाच्या सत्तेच्या पाठबळावर अनेक उपद्व्याप केले आहेत. विरोधकांची समाज माध्यमांवर यथेच्छ बदनामी करण्यात त्यांचा हात कोणीच धरणार नाही. अनेकांवर त्यांनी हल्ले केले आहेत. बग्गा यांनी केजरीवाल यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा भाषेचा वापर करून भाजपा कार्यकर्त्यांना भडकवले. केजरीवाल यांना जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य या महाशयांनी केले.

त्यावर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. बग्गा यांना अटक करून पंजाबात नेऊ नये म्हणून भाजपाशासित राज्यांनी पंजाब पोलिसांची अडवणूक केली व त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून पळवून लावले. दिल्ली व हरयाणा पोलिसांचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे न्यायालयानेच म्हटले आहे. याचा अर्थ असा की, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कितीही झुंडशाही, मनमानी केली तरी केंद्र सरकारचे पोलीस त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून आरोपींना पळवून लावतात. यालाच अराजक किंवा हुकूमशाही म्हणतात,” असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.