स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी आ. वैभव नाईक यांचा शासनाच्या निधीवर डल्ला : संतोष कानडे

0
545

कणकवली : एकीकडे जनतेच्या विकासासाठी निधी नाही आणि दुसरीकडे मात्र आमदार वैभव नाईक शासकीय निधीतून स्वतःच्या मालमत्तेचा विकास करत आहेत ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. आमदार असतानाही स्वतःची प्रॉपर्टी विकसित करण्यासाठी शासनाच्या निधीवर आ. वैभव नाईक हे डल्ला मारत असल्याचे हे सिद्ध झाले आहे. याबाबत आम्ही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहोत. याबाबत १० दिवसांत संबंधितांकडून कारवाई झाली नाही तर कोर्टात याचिका दाखल करणार आहोत असा इशारा भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला.

कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे बोलत होते . यावेळी भाजपचे उपतालुकाध्यक्ष शशिकांत राणे , वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत , भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, समर्थ राणे उपस्थित होते .

संतोष कानडे म्हणाले,शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी हळवळ येथील आपल्या मालकीच्या सर्वे नंबर ७१ व ७२ जमिनीत रस्ते व गटार बांधकाम करण्यासाठी शासनाच्या ७० ते ८० लाख रुपयांचा वापर केला आहे . याबाबत आम्ही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी तक्रार करणार असून गटार आणि रस्ता कामासाठी हा निधी खर्चून जनहिताऐवजी स्वहित आमदार वैभव नाईक करत आहेत . याविरोधात जनआक्रोश आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला.

श्री. कानडे म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी हळवल गावातील स्वमालकीच्या सर्व्हे नं ७१ व ७२ मधील जमिनीत प्लॉटिंग करून अंतर्गत सुविधेसाठी ८० लाखांचा निधी शासनाच्या २५/१५ योजनेंतर्गत वापरला आहे. त्यातील ४० लाखाची कामे हळवल ग्रा.पं.तर्फे निविदा प्रक्रिया सुरू आहे. शिल्लक निधीचे टेंडर टप्याटप्याने निघणार आहे. हा रस्ता देवतळीकडे जाणारा रस्ता असे नाव दाखविण्याचा प्रयत्न केला आहे . गटार आणि रस्ता कामासाठी हा निधी खर्चून जनहिताऐवजी स्वहित आमदार वैभव नाईक करत आहेत , असा आरोप त्यांनी केला . केवळ ४७ कोटींचा जिल्ह्याचा आराखडा असताना त्यातील तब्बल ४० लाखाच निधी वैभव नाईक स्वतःची प्रॉपर्टी विकसित करण्यासाठी करणार आहेत.

देवतळीकडे जाणारा रस्ता दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे . जनतेचा पैसा स्वतःच्या प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी लाखोंचा निधी खर्च करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांची तक्रार जिल्हाधिकारी , कोकण आयुक्त , अर्थ खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडेही लेखी तक्रार करणार आहोत . याबाबत १० दिवसांत संबंधितांकडून कारवाई झाली नाही तर कोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहोत . तसेच शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे संतोष कानडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.