सावंतवाडीत पोलीस गस्त वाढविली…!

0
436

सावंतवाडी : शहरात सलग तीन दिवस चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. चोरट्यांनी बंद घरे फोडून डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती मौल्यवान वस्तू लागल्या नाहीत. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात व आजुबाजूच्या गावात पेट्रोलिंग केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. चार दिवसांपूर्वी शहरातील उभाबाजार येथील अॅड. बाळकृष्ण टंगसाळी, विठ्ठल मंदिरजवळील गोवेकर कुटुंबीय आणि वैश्यवाडा येथील दीक्षा आकेरकर यांची बंद घरे अज्ञात चोरट्याने फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती मौल्यवान वस्तू न लागल्याने चोरीचा प्रयत्न निष्फळ ठरला. सलग तीन दिवस झालेल्या चोरीच्या घटनांनी पोलीस यंत्रणेची झोप उडाली. पावसाळ्याच्या कालावधीत चोरीच्या घटना होऊ नयेत, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. चोरीच्या घटना रोखाव्यात. रात्रीची गस्ती वाढवावी, या मागणीचे निवदेन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पोलीस निरीक्षक कोरे यांना दिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.