राणे भाजपात नसते तर वैभव नाईक सर्वप्रथम शिंदे गटात गेले असते : अमित इब्रामपूरकर

0
957

मालवण : बंडखोर सामंत, केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार जरी गेले तरी मी शिवसेनेत राहणार असल्याचे सांगत आहेत. शक्तीप्रदर्शन करत आहेत. सेनेच्या कार्यकर्त्याना स्वतः फटाके देऊन, गाडीतून झेंडे, बॅनर नेऊन स्वतःचा सत्कार घडवून आणत आहेत. मात्र, हेच वैभव नाईक जर नारायण राणे भाजपामध्ये नसते तर आमदार वैभव नाईक सर्वप्रथम एकनाथ शिंदे गटात सामील झाले असते अशी चर्चा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कुडाळ मालवणच्या मतदारांमध्ये असल्याचेही इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यामध्ये सेनेत गद्दारी केलेल्यांचा निषेध, शाई फेक, जोडे मारो, पुतळे जाळणे अशी आंदोलने होत असताना जिल्ह्यातील सेनेच्या बंडखोरांबाबत चकार शब्दही वैभव नाईक काढत नाहीत किंवा साधा निषेधही करत नाहीत. शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांच्याबाबतही बोलत नाही. फक्त आपला सत्कार घडवून आणतात याच गौडबंगाल काय?

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. बंडखोर आमदांना त्यांच्या सोबत असलेल्यांना शिवसैनिक घरी पाठवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत. जे शिवसेनेशी गद्दारी करीत आहेत त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माफ करणार नाहीत अशी संतप्त भावना इतर जिल्ह्यांमध्ये आहे. पण सिंधुदुर्गात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एक आमदार शिंदे गटात सामील झाला तरी आमदार नाईक फक्त आपण निष्ठावंत असल्याचाच ढोल बडवत आहेत.

नारायण राणे भाजपात नसते तर आमदार वैभव नाईक सर्वप्रथम एकनाथ शिंदे गटात सामील झाले असते अशी चर्चा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कुडाळ मालवणच्या मतदारांमध्ये आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या संबंधाना धक्का न लावता न दुखावता सत्कार आणि निष्ठावंत एवढंच करून वैभव नाईक मातोश्रीची फसवणुक करत असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.