रविंद्र जाडेजाचं कसोटीतलं पहिलं शतक, भारताचा डाव घोषित

0
552
अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ६४९ धावांपर्यंत मजल मारली आहे. रविंद्र जाडेजाने तळातल्या फलंदाजांना सोबतीला कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक साजरं केलं. जाडेजाने शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. जाडेजाने नाबाद १०० धावांच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकार लगावले आहेत.त्याआधी पहिल्या सत्रात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीची नोंद केली. ऋषभ पंतच्या साथीने संघाचा किल्ला लढवत विराटने आपल्या कारकिर्दीतलं २४ वं  शतक झळकावलं.दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतनेही आक्रमक फटकेबाजी करत विराटला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत पंतने काही चांगले फटके खेळले. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत आपलं शतक साजरं करेलं असं वाटत असतानाच देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला.अखेर उपहारानंतर विराट कोहलीला माघारी धाडण्यात वेस्ट इंडिजला यश आलं. लुईसच्या गोलंदाजीवर देवेंद्र बिशुने कोहलीचा झेल घेतला. कोहलीने २३० चेंडूत १३९ धावांची खेळी केली, त्याच्या या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र दुसऱ्या बाजूने जाडेजाने किल्ला लढवत ठेऊन आपलं पहिलं वहिलं शतक साजरं केलं. वेस्ट इंडिजकडून देवेंद्र बिशुने ४ तर शेरॉन लुईसने २ बळी घेतले. आता भारताने दिलेलं आव्हान वेस्ट इंडिजचे फलंदाज कसं पूर्ण करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.