पणजी : गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात चार नव्या कोर्या चित्रपटांचा शुभारंभी प्रयोग म्हणजेच प्रिमियर शो होणार आहेत. उद्घाटनानंतर पहिला प्रिमियर ‘सहेला रे’ चित्रपटाचा होणार असून ह्या सिनेमात सुमित राघवन, सुबोध भावे व मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भुमिका आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांचे आहे.
शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मॅकेनिझ पॅलेस सिनेगृहात ओमकार बर्वे दिग्दर्शित ‘दीड’ सिनेमाचा आशिया प्रिमियर दाखवला जाणार आहे. ह्या चित्रपटात केतकी नारायण, रेणुका दफ्तरदार, श्रेयस कोटा व शिवराज वायचल यांच्या भुमिका आहेत.
मॅकेनिझ पॅलेस मध्येच शनिवारी संध्याकाळी सात वाजता सुहास जोशी यांची मध्यवर्ती भुमिका असलेला ‘क्रिप्टो आजी’ ह्या अमित अग्रवाल दिग्दर्शित चित्रपटाचा जागतिक प्रिमियर होईल. चित्रपटातील इतर कलाकारांमध्ये शिवानी टांकसाळे वअनिकेत विश्वासराव यांचा समावेश आहे.
समारोपाच्या कार्यक्रमात ‘पिल्लू बॅचलर’ ह्या चित्रपटाचा प्रिमियर शो दाखवला जाणार आहे. सुनिल फडतरे, तानाजी घाडगे, मोहन आगाशे, सयाजी संजीव व शशांक शेंडे यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट लक्ष्मण गुट्टे यांनी दिग्दर्शित केला आहे.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता आयनॉक्स मध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत ह्यांच्या हस्ते होणार असून ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे व पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोंसेरात हजर राहणार आहेत.