नवी दिल्ली :
सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळीत हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश रमना यांनी न्यायमूर्ती ललित यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे. नियमानुसार, निवृत्त होणारे सरन्यायाधीश नवीन सरन्यायाधीशच्या नावाची शिफारस करतात. सरन्यायाधीश रमना २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.
न्यायमूर्ती उदय लळीत मुस्लिमांमधील ‘तिहेरी तलाक’ प्रथेला बेकायदेशीर ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांचा भाग आहेत. बार असोसिएशनमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती होणारे ते दुसरे सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती एस. एम. सिक्री हे मार्च १९६४ मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती झालेले पहिले वकील होते. जानेवारी १९७१ मध्ये ते १३ वे सरन्यायाधीश झाले.
न्यायमूर्ती उदय लळीत हे विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमना २६ ऑगस्ट रोजी निवृत्त झाल्यानंतर, ते भारताचे ४९ वे सरन्यायाधीश बनणार आहेत. न्यायमूर्ती ललित यांची १३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा ते प्रसिद्ध वकील होते. न्यायमूर्ती ललित तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऑगस्ट २०१७ मध्ये ३-२ अशा बहुमताने ‘तिहेरी तलाक’ असंवैधानिक घोषित केला होता. त्या तीन न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती लळीत यांचाही समावेश होता.