सावंतवाडी वनविभागात रेंजर्स असोशिएशन कोल्हापूरची बैठक

0
257

सावंतवाडी : कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बैठक रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर शाखेच्यावतीने आज वनविभाग सावंतवाडी येथे घेण्यात आली. वनविभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना मोठ्या संख्येने रिक्त असणाऱ्या वनपाल, वनरक्षक, लेखापाल,लिपिक इ. पदे व त्यामुळे क्षेत्रीय तसेच कार्यालयीन कामकाज करताना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली.

सर्वच पाचही जिल्ह्यातील वनविभागामध्ये क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध समस्यांबाबत सखोल चर्चा करून त्याबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांना अवगत करण्याबाबत एकमत झाले.दरम्यान बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात असंवैधानिक भाषा वापरल्यानंतर लगेचच वनक्षेत्रात अपप्रवेश करणाऱ्या मेंढपाळांनी तेथील शासकीय कर्तव्यावर असणाऱ्या दोन वनमजुरांवर प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेचा असोशिएशनच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

तसेच,नूतन मुख्य वनसंरक्षक वनवृत्त कोल्हापूर आर. एम. रामानुजम यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2022 रोजी वनवृत्तामध्ये वन, वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत उत्कृष्ठ कामकरणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देऊन गौरविल्याबद्दल एकमताने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त विभागीय वनाधिकारी दीपक शिरोडकर, रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर चे अध्यक्ष नंदकुमार नलावडे,सचिव अरविंद कांबळे तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.