Himalayan Khardung La Challenge 2022 | जगातील सर्वात उंच ‘खारदुंगला चॅलेंज’मध्ये सिंधुपुत्रांचा झेंडा !

0
248

सावंतवाडी : देशातच नव्हे तर जगभरात सर्वात उंचावर असलेल्या खारदुन्ग्ला चॅलेंज रन मध्ये ओंकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर या सिंधूपुत्रांनी झेंडा रोवला. नवरत्नांची खाण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने काहीतरी वेगळे निर्माण करण्याचे धाडस करणारे युवक आपल्या कामगिरीने छाप पाडत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधू रनरटीमचे ओंकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर काही वर्षापासून देशभर होणाऱ्या विविध रन इव्हेंटमध्ये भाग घेऊन जिल्ह्याचे नाव गाजवत आहेत. यातच भर म्हणजे देशातच नव्हेतर जगभरात सर्वात उंचावर असलेल्या आणि सर्वात कठीण अश्या खारदुंगला चॅलेंज रन मध्ये या दोघांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत जगभरात आपल्या देशाचे आणि जिल्ह्याचे नाव गाजवले.

समुद्रसपाटी पासून सुमारे १८००० फुटावर म्हणजे ६००० मीटर उंचीवर होणाऱ्या या खडतर रनमध्ये जगभरातून १५० रनर निवडले जातात. त्यात या वर्षी ओंकार आणि प्रसाद यांची निवड झाली. या दोन्ही धावपटूंनी काही वर्षे सातत्यपूर्ण सराव, जिद्ध, चिकाटी आणि योग्य परिश्रम घेऊन या रनमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली. परंतु निवड होऊन रन वेळेत पूर्ण करणे काही सोपे नव्हते. समुद्रसपाटीपासून उंचावर असल्याने सतत बदलते हवामान, कधी पाऊस, बर्फ वर्षाव, थंडी, कोरडे हवामान, कडक ऊन आणि यात भर म्हणजे कमी प्रमाणात असलेला ऑक्सिजन प्राणवायू (३०-४०%), या सर्व आव्हांनाना सामोरे जात ७२ किलोमीटर्स १४ तासात पार करणे म्हणजे एक दिव्यच.

या दोघांनीही लेहमध्ये पोहोचून ६-७ दिवस सातत्याने सराव करून स्वतःला तिथल्या वातावरणात जुळवून घेतले. ९ सप्टेंबर ला सकाळी ३ ला रन चालू झाली. त्यावेळेस तापमान -३ डिग्री होते. अंगावर ३-४ टी शर्ट्स. २ जॅकेट, २ रन पँट्स आणि भर म्हणजे पाटीवर २ लिटर पाणी, खाण्याचे सामान असे अंदाजे ५ ते ६ किलो वजन घेऊन पळायचे होते. पहिले ३२ किलोमीटर कठीण चढण, त्यात कमी कमी होणारे ऑक्सिजनचे प्रमाण, त्यामुळे डोक्यात रक्त गोठणे, चक्कर येणे, उलट्या होणे अगदी जास्त प्रमाणात जोर लावून रन केला तर कमी ऑक्सिजनमुळे कोमात जाणे, यासारखी आव्हाने होती. या सगळ्यावर मत करून या सिंधूपुत्रांनी दाखवून दिले कि अभेद्य आणि अजिंक्य सिंधुदुर्ग किल्ल्याप्रमाणेच इथले सुपुत्र आहेत. या रनमध्ये १९४ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातून १२३ जणांनी हि रन पूर्ण केली. प्रसाद कोरगावकरने हि रन ११ तास आणि ५१ मिनिटात पूर्ण करून १२३ धावकांमधून ६२ वे स्थान पटकावले तर ओंकार पराडकरने हि रन 11 तास आणि ८ मिनिटात पूर्ण करून १२३ धावकांमधून ९६ वे स्थान पटकावले. लेह लडाखसारख्या दुर्गम आणि थंड प्रदेशात जिथे फक्त भारतीय जवान राहून देशसेवा करतात त्या ठिकाणी या दोघांनीही वेळात रन पूर्ण करून दाखवून दिले कि जिद्द आणि चिकाटी असेल तर काही अशक्य नाही.

रन वेळेत पूर्ण करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले. सावंतवाडी नगरपालिका मुख्यधिकारी जयंत जावडेकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. प्रशांत मढव, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ. अभिजीत वझे, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. शरावती शेट्टी, सिंधुदुर्ग जिल्हा ह्यूमन राईट्स अससोसिएशन कोकण विभाग अध्यक्ष संतोष नाईक, दैनिक कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, उपसंपादक प्रा. रुपेश पाटील, पत्रकार हरिशचंद्र पवार, सिंधू रनर टीमचे सर्व सदस्य, बॉर्देकर कलमांचा केरवडे, केरवडे आणि चराठा वझरवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे अससोसिएशनचे प्रशिक्षक वसंत जाधव, राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे माजी प्राचार्य विठ्ठल नाईक, पराडकर, कोरगावकर आणि नाईक परिवार या सर्वानी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.