भाजपचा `कौल` उलटवणारे ते `पाच` नगरसेवक कोण ?

0
450

मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि भाजप समर्थक मिळून एकूण १५ नगरसेवक होतात. या सर्व १५ नगरसेवकांची भेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरूवारी रात्री घेतली होती. या भेटीत कामत- भाजप गटातर्फे शिरोडकर यांना नगराध्यक्षपदी निवडण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. शुक्रवारी प्रत्यक्ष निवडणूकीवेळी भाजप समर्थक शिरोडकर यांना केवळ १० मतेच पडले आणि विरोधी गटाचे घनश्याम शिरोडकर निवडून आले. भाजपसाठी ही नाचक्कीच ठरली. कालच भाजपात दाखल झालेल्या दिगंबर कामत यांच्यासाठी हा फार मोठा धक्का ठरला. त्यांनी आपल्या समर्थक गटाच्या १० नगरसेवकांसह भाजप समर्थक ५ नगरसेवकांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. आज मडगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपच्या झालेल्या नाचक्कीमुळे मुख्यमंत्री बरेच नाराज झाले. त्यांनी उघडपणे या नगरसेवकांना सुनावले. ज्यांना भाजपसोबत राहायचे नसेल तर त्यांनी बिनधास्तपणे बाहेर पडावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नगराध्यक्षपदासाठी गुप्त मतदान झालं होतं आणि त्यामुळे कामत- भाजप गटातील कुठल्या ५ नगरसेवकांनी बंडखोरी केली हे कळायला मार्ग नाही. भाजप समर्थक नगरसेवक कामत यांच्या गटाकडे बोट दाखवतात तर कामत गटाकडून भाजप गटातील नगरसेवकांकडे बोटं दाखवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मात्र आपल्या राजकीय चाणक्यनितीचा वापर करून मडगाव पालिकेवर आपले वर्चस्व राखले. कालपर्यंत काँग्रेसच्या बंडखोरीची चर्चा सुरू असताना आज मडगाव पालिकेतील बंडखोरी सर्वाधिक चर्चेचा विषय बनली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.