पूर्वा गावडेचे जलतरण स्पर्धेत मोठे यश | जलतरण स्पर्धेत 5 रौप्य, 2 कांस्यपदकाची कमाई

0
171

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेत विविध जलतरण क्रीडा प्रकारात 5 रौप्यपदके आणि 2 कांस्य पदकाची कमाई केली. यापुर्वीही भुवनेश्वर व अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलाव येथे कोल्हापूर स्विमिंग हब मार्फत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धा 16 ते 18 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राज्यभरातून 538 मुले सहभागी झाली होती. त्यात मुली 260 मुले 278 यांचा समावेश होता. या स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथील पूर्वा संदीप गावडे हिने 5 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदके मिळविली.

पूर्वाने जलतरण स्पर्धेत 1500, 800, 400 आणि 200 मीटर फ्रीस्टाईल या चारही प्रकारात दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदके पटकावली. 200 मीटर बटरफ्लाय मध्येही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले तर 100 मीटर बटरफ्लाय व 100 मीटर फ्रीस्टाईल मध्ये तिसरा क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले.

जुलै मध्ये ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. त्यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या 18 वर्षाखालील ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतही 200 मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर पुन्हा तिने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेतही सातत्य ठेवत यशस्वी कामगिरी बजावली.

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे राहणारी असून ओरोस डॉन बॉस्को व पणदूर स्कुलमध्ये सातवी पर्यत शिक्षण घेतल्यानंतर पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडून जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्गनगरी व जलतरण तलावात प्रवीण सुलोकार व दीपक सावंत यांच्याकडून प्रशिक्षण घेत होती.  पुणे येथे ती दहावीमध्ये शिक्षण घेत जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.