कुडाळ येथून 24 सप्टेंबरला होणार मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी 1500 किमी सोलो सायकलिंग राईडची सुरूवात

0
144

कुडाळ : मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकलिंगची जनजागृती करण्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध सायकल पटू निरंजन वेलणकर यांनी दि 24 सप्टेंबर रोजी कुडाळ येथून 1500 किमी च्या सायकल राईडचा शुभारंभ करण्याचा निर्धार केला आहे. रोटरी क्लब आॅफ कुडाळ व सायकलिस्ट असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे अध्यक्ष अमित वळंजू, सेक्रेटरी दिनेश आजगावकर, खजिनदार डॉ संजय केसरे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 गव्हर्नर एरिया एड गजानन कांदळगावकर, प्रणय तेली, राजन बोभाटे, असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, अॅड राजीव बिले, शशिकांत चव्हाण,वैद्य सुविनय दामले यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

हि सायकल राईड 4 राज्यातून 20 दिवसात 14 आॅक्टोबरला पूर्ण होणार आहे. सिंधुदुर्ग -गोवा-बेळगावी-कलबुर्गी-हैद्राबाद-वारंगल-गडचिरोली-नागपूर असा प्रवास होणार आहे. वेलणकर यांनी यापूर्वी लदाख, स्पीतिसह सोलो सायकल मोहिमा यशस्वी केलेल्या आहेत.

प्रसिध्द सायकलपटू निरंजन वेलणकर यांच्या उपस्थितीत 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वा कुडाळ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांशी संवाद कायक्रम होणार आहे. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे. केवळ मानसिक आरोग्याचे समस्याग्रस्त नाही तर आपण सर्व. विशेष समस्याग्रस्त (जसे ऑटीझम, मेंटल रिटार्डेड किंवा डाऊन्स सिंड्रोम असलेल्या व्यक्ती) ह्यांच्यापासून अगदी युवा विद्यार्थी आणि प्रत्येकासाठी हा विषय महत्त्वाचा आहे.

ह्या सायकल प्रवासामध्ये हा विषय व्यापक समाजापुढे ठेवला जाईल. मानसिक रोग, मानसिक समस्या आणि मानसिक विकलांगता असलेल्यांच्या समस्या ह्याबद्दल जागरूकता असणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर अशा व्यक्तींना आवश्यक ती मदत दिली जाऊ शकते. सर्वसामान्य लोक- शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्व ह्यांच्यासोबत संवादातून ह्या सायकल प्रवासात ह्याबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा विषय सर्वांचा आहे. सायकलिस्ट सामाजिक संस्था, समूह व लोकांसोबत बोलेल व स्थानिक पातळीवरील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तो साधी- सिंगल गेअर एसएलआर सायकल वापरेल. त्यामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे की, प्रत्येक जण स्वत:ची क्षमता वापरून उपलब्ध साधनाद्वारे अशी गोष्ट करू शकतो.

कारण मुख्य प्रवाहात नसलेल्यांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. सुरुवातीला सायकलिस्टने मुंबईमधील संस्थांसह राईड सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु महाराष्ट्रातील शहरांमध्ये ह्याबद्दल थोडी तरी जागरूकता आहे. त्यामुळे सर्वाधिक वंचित व दूर राहिलेला प्रदेश का न घ्यावा असा विचार केला. त्यासह ह्यातील मुख्य मॅसेज कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाणे, आपल्या मानलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाणे आणि अपरिचिताबद्दल संवेदनशील होणे हा आहे. त्यामुळे हा सायकल प्रवास कोंकणातील कुडाळमध्ये सुरू होईल व नंतर गोवा, कर्नाटक, तेलंगणा व पुन: महाराष्ट्राच्या दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा त्यात समावेश असेल.

निरंजन वेलणकर, ३७ ह्याने लदाख़ आणि स्पीतिसह अनेक सोलो सायकल मोहिमा केल्या आहेत. त्याने महाराष्ट्रामध्ये आरोग्य व एचआयव्हीबद्दल जागरूकतेसाठी आणि योग व ध्यानाच्या प्रसारासाठीही सायकल प्रवास केले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.