बॅ. नाथ पै अनेक बिरुदावलींनी नटलेलं व्यक्तिमत्व : भरत गावडे

0
140

सावंतवाडी : बॅ. नाथ पै हे सर्व सामान्यांसाठी काम करणारे व अनेक बिरुदावलींनी नटलेले व्यक्तिमत्त्व होते. प्रचंड अभ्यासू, अभ्यासाने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे बॅ. नाथ पै म्हणजे अलौकिक समाजकारणी होते, असे प्रतिपादन नाथ पै यांच्या कार्याचे गाडे अभ्यासक व सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे यांनी शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर प्रा. सुभाष गोवेकर, संस्था सचिव व माजी मुख्याध्यापक मुकुंद धुरी, मुख्याध्यापक सलीम तकीलदार, सहाय्यक शिक्षिका अर्चना चव्हाण, सहाय्यक शिक्षक विश्वास धुरी, विद्यानंद पिळणकर, आनंद हळदणकर, सुप्रिया पेडणेकर, राहुल कानडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व नाथ पै यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी आपल्या ओघवत्या भाषा शैलीत विद्यार्थ्यांना नाथ पै यांच्या कार्याची ओळख करून देताना भरत गावडे म्हणाले की, नाथ पै यांनी आपल्याला सृष्टीचे मित्र बना, माडाच्या झाडासारख्ये कणखर व्हा, न्यूनगंड बाजूला करून चांगले छंद जोपासा, वाचनावर भर द्या, व्यसनाधीनतेपासून दूर रहा असे अनेक विचार दिलेत. या महान व्यक्तीचे विचार आपल्या आचरणात आले तर समाजात परिवर्तनाची नवीन चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही, असे गावडे यांनी सांगितले.

यावेळी प्रा. सुभाष गोवेकर यांनी कोकणचे रत्न म्हणजे नाथ पै होय, अशी मोठी माणसे नेहमी विचाराने आपल्यासोबत असतात. अशा महान लोकांचे विचार आपण सर्व सामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करूया, असे सांगितले. यावेळी संस्था सचिव मुकुंद धुरी यांनी नाथ पै यांच्या कार्याचा आढावा घेताना नाथ पै यांनी कोकणातील व महाराष्ट्रातील समस्या संसदेत प्रभावीपणे मांडण्याचे काम केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला चालना मिळाली, अशा लोकांचे विचार आपण अंगिकारले पाहिजेत असे सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना नाथ पै यांच्या जीवनावर आधारित तोंडी प्रश्न विचारण्यात आले. त्यात यशस्वी झालेल्या सानिका डिचोलकर, स्वानंदी सामंत, शांताराम वारंग, दुर्वा धुरी, परेश जांभळे, हर्षद झोरे, सायली डिचोलकर या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ कांबळे यांनी केले. प्रास्ताविक व परिचय मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी तर आभारप्रदर्शन परशुराम नार्वेकर यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.