डॉक्टर झाल्यानंतर १७ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द! हायकोर्टाचा दणका

0
662
मुंबई : गोदावरी फाउंडेशच्या जळगाव मधील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने २०१२-१३ वर्षात १७ विद्यार्थ्यांना ‘एमबीबीएस’ला दिलेले प्रवेश बेकायदा ठरवून, उच्च न्यायालयाने रद्द केल्याने त्यांच्या डॉक्टरकीच्या पदव्याही रद्द होतील.न्या. तानाजी नलावडे व न्या. सुनील कोतवाल यांच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल दिला. राज्य सरकारच्या समितीने हे प्रवेश बेकायदा ठरविल्यानंतर, प्रवेश नियंत्रण समितीने ते जानेवारी २०१३ मध्येच रद्द केले होते. न्यायालयाने तो निर्णय कायम केला. समितीच्या निर्णयाविरुद्ध कॉलेजने मुंबईतील उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर दिलेल्या अंतरिम आदेशानुसार, विद्यार्थ्यांनी शिक्षण सुरू ठेवून अभ्यासक्रमही पूर्ण केला, परंतु अंतिम सुनावणीनंतर प्रवेशच बेकायदा ठरल्याने, अंतरिम आदेशाआधारे ते शिकत राहिले.एवढ्यावरून त्यांचे प्रवेश नियमित होत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.प्रवेश नियंत्रण समितीचे वेळापत्रक न पाळता पैसे कमावण्यासाठी गुणवत्तेत खाली असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याने, महाविद्यालयाची मान्यता व आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्नता रद्द करण्यासाठी राज्य सरकार व विद्यापीठाने पावले उचलावीत, असाही आदेश दिला.बेकायदा प्रवेशास जबाबदार असलेल्यांची नावे कॉलेजने १५ दिवसांत कळवावीत. त्यानंतर, त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरू करावी, असेही निर्देश दिले. निकालावर अपीलासाठी खंडपीठाने आदेश ४५ दिवसांसाठी तहकूब ठेवले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.