सिंधुदुर्गमधील एक लाख घरात इंटरनेट सेवा व मोफत सेट टॉपबाक्ससाठी सामंजस्य करार

0
1199

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ई एज्युकेशन व स्पर्धा परीक्षेचे धडे मिळावेत,यासाठी जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी व मोफत सेट टॉप बॉक्स देण्यासंबंधी भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल) व स्ट्रीम कॉस्ट कंपनी यांच्यात आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी,ग्रामीण भागातील घरे इंटरनेटने जोडला जाणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असून यामाध्यमातून कोकणात होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे कोकणवासींयाचे जीवन उजळून निघेल, असे प्रतिपादन श्री. केसरकर यांनी केले. श्री. केसरकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक पियुष खरे, स्ट्रिम कास्टचे चेअरमन निमिष पांड्या, स्ट्रिम कास्टच्या ई एज्युकेशन विभागाच्या प्रमुख असिमा चिल्लाळ आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीची घोषणा केली.
श्री. केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गसारख्या भागात इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण असून सिंधुदुर्गवासियांसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेटटॉप बॉक्समध्ये बीएसएनएलची इंटरनेट जोडणी असणार आहे. यामधून विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक अभ्यासक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग आदी सुविधा असणार आहेत. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोचण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे. स्ट्रिम कास्ट कंपनीने हे तंत्रज्ञान लो बँडविथवर उपलब्ध करून दिले आहे. या योजनेत सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार असून इंटरनेट सेवेसाठी अतिशय माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.
कोकणातील पदवीधरांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंधुदुर्गमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे. यासाठी स्ट्रिमकास्ट कंपनी सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबरोबरच इतर चार जिल्ह्यातही या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय ही कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर सिंधुदुर्गमध्ये उभारणार आहे. यामाध्यमातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान क्रांती होणार आहे, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. श्री. केसरकर म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधनी सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  या केंद्राच्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीने विविध केंद्रांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत पुढे येण्यासाठी फायदा होणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, सावंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून राज्यालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटतील असे अधिकारी घडतील. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांचे हे स्वप्न ई लर्निंगच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णधवल दूरचित्रवाहिनीपासून ते आजच्या मोबाईलमधील दूरचित्रवाहिन्या इथपर्यंत तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन येथील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे धडे मिळू शकतील. त्याचबरोबरच शालेय अभ्यासक्रमात स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती दिल्यास अनेक चांगले अधिकारी महाराष्ट्रातून घडू शकतील व राज्य पुढे जाईल. दुर्गम भागातील लोकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी टेलिमेडिसीन सुविधा पुरविण्याचा प्रारंभ आम्ही सुरू केला होता. यावेळी श्री. पांड्या यांनी स्ट्रिमकास्टच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवांविषयी माहिती दिली. श्री. खरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच 104 मोबाईल टॉवर उभारण्यात येत असून त्यामाध्यमातून थ्रीजी सेवा पुरविणार असल्याची माहिती दिली. श्रीमती असिमा यांनी ई एज्युकेशन संबंधी माहिती दिली.

योजनेची वैशिष्ट्य : सिंधुदुर्गमधील एक लाख घरात सेट टॉप बॉक्स मोफत देणार, प्रथम अर्ज भरणाऱ्यास प्रथम प्राधान्य, यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद, सावंतवाडी नगरपालिकेची महत्त्वपूर्ण मदत
, बीएसएनएलमार्फत माफक दरात इंटरनेट सेवा.यामाध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा मिळणार .या योजनेचा नंतर इतर चार जिल्ह्यात विस्तार होणार. स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन. आसपासच्या तालुक्यांमध्येही इंटरनेटच्या माध्यमातून परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळणार

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.