कणकवली पत्रकार संघाकडून रेल्वे पोलिस अब्दुल सत्तार यांचा सत्कार

0
588

कणकवली : रेल्वे सुरक्षा बलाचे कणकवली रेल्वेस्टेशनवर कार्यरत असलेल्या हेडकॉन्स्टेबल अब्दुल सत्तार यांची दक्षिण रेल्वेमध्ये बदली झाली आहे. गेली दहा वर्षे कणकवली रेल्वे स्टेशनवर कार्यरत असताना अब्दुल सत्तार यांनी एक कर्तव्यदक्ष पोलिस अशी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत कणकवली तालुका पत्रकार संघाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.कणकवली तालुका पत्रकार संघांची सर्वसाधारण सभा येथील शासकीय विश्रामगृह येथे अध्यक्ष भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, माजी अध्यक्ष अजित सावंत, संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे, रमेश जोगळे, नितीन सावंत, माणिक सावंत, विरेंद्र चिंदरकर, दिलीप हिंदळेकर, महेश सावंत आदी पत्रकार उपस्थित होते. या सभेमध्ये रेल्वे पोलिस अब्दुल सत्तार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. केरळ-कन्नूर येथील मूळचे असलेले अब्दुल सत्तार हे गेली दहा वर्षे कणकवली रेल्वे स्टेशनवर पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. सहकार्‍यांसमवेत कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतानाच अब्दुल सत्तार हे कणकवली शहराशी एकरूप झाले होते. रेल्वे गाड्यांमधून होणारी चोरटी दारू वाहतूक तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी त्यांनी चांगली कामगिरी केली. या कामगिरीची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांच्या हस्ते अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वे पोलिस भूषण कोचरेकर उपस्थित होते.रेल्वे पोलिस म्हणून कार्यरत असताना आपण कर्तव्य बजावत होतो. गेल्या दहा वर्षात आपण कणकवलीवासीयच होवून गेलो होतो. आपली बदली ही गावापासून जवळच्या अंतरावर झाली असली तरी कणकवलीवासीयांकडून मिळालेले प्रेम आपल्या नेहमीच स्मरणात राहणार आहे, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.