मालवण : मालवण-कसाल रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकासह सर्वसामान्य जनता शिव्या घालत आहेत. याबाबत बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून खड्डे बुजवून घ्यावे, अन्यथा त्या ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी अजिंक्य पाताडे व कमलाकर गावडे यांनी केली. यावर बांधकामच्या अधिकाऱ्यांनी दुसरा ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याचे अजब उत्तर दिले. याबाबत गटविकास अधिकारी पराडकर यांनी संबंधित ठेकेदाराला खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्याच्या सूचना द्या, असे सांगितले. मालवण पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी, यासह अन्य उपस्थित होते. तालुक्यात बुधवळे-कुडोपी व आडवली या दोन ग्रामपंचायतीमध्ये सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याने राजू परुळेकर यांनी अभिनंदनाचा ठराव घेताना वीज बचतीसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात यावा, अशी सूचना मांडली. यावर पराडकर यांनी सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीना सूचना केल्या जातील, असे स्पष्ट केले. सभेत कमलाकर गावडे यांनी रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी निधी मिळाला नसल्याने सभागृहाचे लक्ष वेधले. काही लाभार्थ्यांना केवळ पहिला टप्पा मिळाला असून उर्वरीत हप्ते प्राप्त झाल्याने अनेकांच्या घरावर टांगती तलवार आहे, असे सांगितले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यानी जिल्हा बँकेच्या आयएफएससी कोडच्या समस्येमुळे निधी वितरणास विलंब होत असल्याचे स्पष्ट केले. सभेत निधी मुणगेकर, गायत्री ठाकूर, सागरिका लाड यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. पंचायत समितीच्या सदस्यांनी खातेप्रमुखानी डावलणे हे चुकीचे आहे. यापुढे एखाद्या मतदारसंघात पाहणी किंवा अन्य कामासाठी गेलेल्या खातेप्रमुखानी सदस्यांना विश्वासात घ्यावे. तसेच सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पुढील सभेपुर्वी पूर्तता करा, अशा शब्दात सर्व विभागाच्या खातेप्रमुखांची कानउघाडणी केली.