मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे अपघात; अपघातात मोटारसायकलस्वार ठार

0
5092

कुडाळ- मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे येथे इनोव्हा कारने मोटर सायकलला दिलेल्या धडकेत बिबवणे येथील मोटर सायकलस्वार आनंद रमेश लुडबे (वय ३५) हा युवक ठार झाला. हा युवक मयत झाल्याचे समजल्यावर कणकवली येथील इनोव्हा कारच्या चालकाने पळ काढला. दरम्यान बिबवणे ग्रामस्थांनी कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बिबवणे येथील आनंद लुडबे हा युवक बेळगाव येथे खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे. तो दर महिन्याला आपल्या बिबवणे येथील घरी येतो. त्याप्रमाणे आज (मंगळवार) दुपारी बेळगाव वरून बिबवणे येथे येत होता. हा युवक बिबवणे येथे आल्यावर कणकवलीच्या दिशेने जाणा-या इनोव्हा कार नंबर एमएच ०७ क्यू ९२३९ याने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये मोटर सायकल नंबर केए २२ ईजे ११८१ अपघात ग्रस्त झाली. या मोटरसायकल वरील आनंद लुडबे हा युवक रस्त्याच्या उजव्या बाजूला कलिंगड खाण्यासाठी दुकानात बसलेल्या ग्राहकाच्या उभ्या असलेल्या इको कार जवळ जाऊन पडला. तसेच त्याची मोटरसायकल सुद्धा त्या ठिकाणी पडली. अपघातात जखमी झालेल्या आनंद लुडबे याला इनोव्हा कार मध्ये बसवून कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. आनंद लुडबे याला अजून दोन भाऊ आहेत. त्यापैकी एक बेळगाव येथे कामाला आहे. तर दुसरा बिबवणे येथे असतो. या अपघाताबाबत यशवंत चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी मध्ये हा अपघात आपल्या कलिंगडच्या विक्री स्टॉल समोर घडला. यामध्ये इनोव्हा कार ने मोटर सायकलला मागून धडक दिली. इनोव्हा कार चालक भरधाव वेगात होता असेही त्यांनी आपल्या खबर मध्ये म्हटले आहे. दरम्यान इनोव्हा कार चालकाने जखमी आनंद लुडबे याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो मृत घोषित झाल्याचे समजल्यावर कार चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला. या अपघातामध्ये कार चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

घराजवळ येऊन झाला मृत्यू- आनंद लुडबे हा बिबवणे नाईकवाडी येथील रहिवाशी आहे. कामानिमित्त बेळगाव येथे असला तरी तो दर महिन्याला आपल्या बिबवणे गावी येत असे. त्याचा जो अपघात झाला आहे त्याठिकाणाहून त्याचे घर काही अंतरावर राहिले. घराजवळ येऊन तो मृत्युमुखी पडला. त्याच्या या निधनानंतर ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.