आडाळीत १४, १५ रोजी मुलामुलींसाठी निवासी जाणीव जागृती शिबिर

0
482

दोडामार्ग: दहावीची परिक्षा दिलेल्या मुलामुलींसाठी १४ व १५ एप्रिल रोजी दोन दिवसांच्या निवासी जाणीव जागृती शिबिराचे आयोजन दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे करण्यात आले आहे.  माध्यमकर्मी सतीश लळीत, कवयित्री डॉ. सई लळीत आणि पत्रकार पराग गावकर यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन १४ रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट यांच्याहस्ते होईल. नि:शुल्क असलेल्या या शिबिरासाठी २५ विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त वंदन करुन शिबिराची सुरुवात होईल. शिबिरामध्ये ‘पर्यावरणाचा लढा कशासाठी?’ (पराग गावकर), ‘माझे मन – माझा मित्र’ (डॉ. रुपेश पाटकर), ‘पु. ल. देशपांडे – एक बहुरंगी व्यक्तिमत्व’ (डॉ. सई लळीत), दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण यांची प्रकट मुलाखत (सतीश लळीत), निवडक लघुपटांचे प्रदर्शन आणि चर्चा,  दोन यशस्वी उद्योजकांशी गप्पा, जंगलभ्रमंती, श्रमदान, खेळ अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आडाळी प्राथमिक शाळेत होणाऱ्या या शिबिरातील दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण यांची प्रकट मुलाखत (दि. १४ रोजी सायं. ५ वा.) आणि निवडक लघुपटांचे प्रदर्शन (दि. १४ रोजी सायं. ७.३० वा.) हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून बाकीचे कार्यक्रम फक्त शिबिरार्थींसाठी आहेत. दहावीची परीक्षा दिलेल्या मुलामुलींना भावी आयुष्यातील वाटचालीला दिशा मिळावी, या हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.