कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेलीच्या १९९९-२००० सालच्या १० वीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला लाकडी बेंच व लायब्ररी कपाट भेट

0
472

वेंगुर्ले : तालुक्यातील शिक्षण प्रसारक समिती वेतोरे संचलित कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली येथे सन १९९९-२००० सालच्या इयत्ता १० बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशालेसाठी रुपये ३३ हजार किमतीचे १० लाकडी बेंच सेट आणि माजी मुख्याध्यापक दिवंगत कै. लिलाधर गोगटे यांच्या स्मरणार्थ रुपये ७ हजार किमतीचे एक लायब्ररी कपाट भेट म्हणून प्रदान केले. तब्बल १९ वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित येऊन हरवलेली पाखरे येतील का परतून या संकल्पनेतून आडेली हायस्कूल येथे रविवार दि ५ मे रोजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी या स्नेहमेळावा कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका जे जे वायंगणकर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक श्री. राऊळ तसेच सहशिक्षक श्री. चव्हाण, श्री. पवार, परब तसेच शिक्षकेतर कर्मचारी शिल्पा जोशी, लाडोबा ऊर्फ बाबा धर्णे, उदय आडेलकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या आजी विद्यार्थिनी नी स्वागतगीत सादर करून व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापक दिवंगत कै. लिलाधर गोगटे, कै. पाटील तसेच कर्मचारी कै. ठाकूर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वायंगणकर, माजी मुख्याध्यापक श्री. राऊळ तसेच इतर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. आपण ज्या शाळेत शिक्षण घेवून आज एक नागरिक घडत आहोत ते केवळ आणि केवळ आपल्या शाळेमुळे म्हणूनच माजी विद्यार्थी वर्गाने संघटित होऊन शाळेत आपल्याला ज्ञानदान करून संस्कारित केले त्या शिक्षकांची आठवण आणि शिक्षण घेतलेल्या संस्थेचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना माजी विद्यार्थी तुषार कांबळी, देवदास देसाई, वामन भोसले, सविता आडेलकर, सरीता धर्णे, समीर गावडे यांनी स्नेहमेळाव्यात मनोगत व्यक्त करताना या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिल्पा परब, प्रमिला वजराठकर, रेश्मा धुरी, रेश्मा चव्हाण, हरेश कुडाळकर, अमित दांडकर, सचिन देसाई, अमोल भोसले, गणेश राणे, भीमसेन परब, संतोष धर्णे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. तब्बल १९ वर्षानंतर शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येवून शाळेबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ठेवतात हे वाखणण्याजोगे असून हा उपक्रम आदर्शवत असून नवीन पिढीला प्रेरणा देणारा असल्याचं मत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वायंगणकर, श्री. राऊळ, श्री. चव्हाण, श्री. पवार, सौ. शिल्पा जोशी यांनी मनोगतात व्यक्त करतानाच या विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत बहुमोल मार्गदर्शन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आधुनिक जडणघडण वाटचालीत विविध सामाजिक उपक्रम राबवून सहकार्य करावे असे आवाहन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वामन भोसले, सचिन देसाई, अमोल भोसले व इतर सहकाऱ्यांनी केले. तसेच स्वागत, सूत्रसंचालन देवदास देसाई तर प्रास्ताविक तुषार कांबळी यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने सौ. वायंगणकर आणि विद्यार्थ्यांच्या वतीने देवदास देसाई यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.