९७ व्या घटना दुरुस्ती तरतुदींची सहकारी संस्थांनी करावी पूर्तता

0
758

सिंधुदुर्गनगरी : सहकारी कायद्यामध्ये झालेल्या ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्थांना स्वायत्ता दिली असून संस्तांनी पुढील बाबींची पुर्तता करणे अनिवार्य केले आहे. संस्थेचे सन २०१७-२०१८चे दोष दुरुस्ती अहवाल विहीत मुदतीत संबंधित निबंधक कार्यालयास सादर करणे व सदर दोष पुर्तता अहवालाचे सन २०१९-२०चे वार्षिक सभेत वाचन करणे, सन २०१८-१९ चे लेखापरीक्षण दि. ३१ जुलै २०१९ पूर्वी पूर्ण करुन घेणे व सदर अहवाल मुदतीत निबंधक कार्यालयास सादर करणे. तसेच सदर लेखापरीक्षण अहवाल सन २०१९-२०च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वाचन करणे, सन २०१९-२० चे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आर्थिक वर्षाकरिता सक्षम लेखापरीक्षकांची नेमणूक करुन संस्थेच्या ठरावासह व संबंधित लेखा परीक्षक यांच्या संमती पत्रासह ३०  दिवसांचे आत विवरणपत्र निबंधक कार्यालयास सादर करणे, सन २०१८-१९चे लेखापरीक्षण अहवालाचा विहीत नमुन्यातील दोष दुरुस्ती अहवाल दोषांची पुर्तता करुन  दोन महिन्यांचे आत संबंधित लेखापरीक्षक यांचेकडे सादर करुन लेखापरीक्षक यांनी शेरे मारल्यानंतर संबंधित निबंधक कार्यालयास सादर करावा, ऑनलाईन रिटर्न विहीत मुदतीत दाखल करणे व इतर अनुषांगिक बाबी पूर्ण करणे. सदर बाबी विहीत मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य केले असून यामध्ये कसूर करणाऱ्या संस्थेविरुद्ध तसेच संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई, दंड, दंडाची शिक्षा, कैद अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तरी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी याबाबींची मुदतीत पुर्तता करावी असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.