मुंबईतील मैत्री कट्ट्याची वर्षपूर्ती…!

0
444

मुंबई : दि. २३ : मैत्री कट्ट्याला मंगळवार २३ जुलैला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त मैत्री कट्ट्याचा कार्यकर्ता सचिन थिटे याचं मनोगत. मागच्या वर्षी २२ जुलैला सुरू झालेला हा कट्टा अविरत, एकही आठवडा खंड न पडू देता कधी एक वर्षाचा झाला हे आमच्याही लक्षात आले नाही. या एक वर्षात मैत्री कट्ट्याने काय कमावले व काय सुटले याचा लेखाजोखा काल वर्षपूर्ती दिनानिमित्त आयोजित केलेल्या सहली मध्ये सर्वांनी घेतला. अमित सारख्या आमच्या तरुण सहकाऱ्यांच्या मनात असणाऱ्या अनेक शंका व प्रश्नांचं निरसन करण्यासाठी एखादी अशी मुक्त गप्पांची जागा असायला हवी जिथे कोणत्याही विषयावर मुक्तपणे सर्वांना गप्पा मारता येतील, या भावनेतून या कट्ट्याची सुरुवात झाली व त्यानंतर मग मैत्री या विषयावर बोलत असताना आपण या कट्ट्याला *मैत्री कट्टा* हेच नाव द्यावं आणि आपली मैत्रीची व्याख्या वैयक्तिक किंवा मर्यादित न ठेवता ती सामाजिक पातळीवर न्यावी असे सर्वांचे मत झाले आणि तेव्हापासून हा कट्टा मैत्री कट्टा म्हणून नावारूपास आला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पहिलीच ऍक्टिव्हिटी म्हणजे *मैत्रीचा हात* ही आम्ही दहिसर पोलीस स्टेशनच्या पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरा करून सुरू केली. त्यावेळी तिथल्या पोलिसांशी खूप छान मैत्री तर झालीच, पण पोलिसांची एक वेगळी बाजू जवळून प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी सुद्धा सर्व कट्टा साथींना मिळाली. त्या दिवशी संध्याकाळी साडे सातच्या आसपास आम्ही पोलीस स्टेशनला पोचलो होतो. आम्ही इतक्या आपुलकीने राखी बांधायला आलोय या गोष्टीचा तिथल्या पोलिस मित्रांना खूप आनंद झाला होता. त्यावेळी तिथले पोलीस निरीक्षक शिंदे यांनी आम्हाला सांगितलं कि- ‘आज पहिली राखी मला तुम्हीच बांधली आहे. माझी बहिण सकाळपासून घरी येऊन थांबलीय पण मला जायला वेळच नाही.’ आणि हे ऐकून आम्ही सर्वजण हेलावून गेलो. आपण फक्त चुका शोधत असताना यांची दुसरी बाजू कधी पाहतच नाही हे आम्हाला प्रकर्षाने जाणवले. आणि सर्व सेवा पुरविणाऱ्या संस्थांसोबत ‘मैत्रीचा हात’ पुढे करण्याच्या या उपक्रमाची खरंच किती गरज आहे हे आम्हाला जाणवले. अवघ्या चार लोकांना घेऊन सुरू झालेल्या या कट्ट्यावर आज एक वर्षात शंभरच्या वर साथी येऊन गेले. त्यामध्ये अगदी लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळेजण या कट्ट्याला येऊन गेले. सुरुवातीलाच ठरवल्याप्रमाणे हा कट्टा म्हणजे एक मुक्त गप्पांचा कट्टा राहिला. यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन कुणावरही नव्हते. जाती-धर्म, वय, लिंग, शिक्षण, विषय कशाकशाचेही बंधन नसणारा हा कट्टा दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता दहिसरला भरत राहिला. आजपर्यंत या कट्ट्यावर अनेक वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर गप्पा झाल्या, तशा वैयक्तिक विषयांवर सुद्धा झाल्या. तरुणांच्या मनात असणाऱ्या फॅशन, लैंगिकता, मैत्री, प्रेम, जोडीदार या विषयांवर तर गप्पा झाल्याच, पण पारंपारिक प्रथा, रूढी, सण-उत्सव यांची चिकित्सा यावरही बोललो. भूत, भानामती पासून तर बुवा बाबाच्या चमत्कारापर्यंत व श्रद्धा/अंधश्रद्धा या विषयावर सुद्धा बोललं गेलं. न्यूनगंड, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन या सारख्या विषयांवर सुद्धा गप्पा झाल्या. स्त्री शक्तीचा जागर, स्त्रिया व करिअर, सावित्रीचा वसा, पुरुषभान, लग्न या विषयांना घेऊन तर बोललं गेलंच त्यासोबत राजकारण, संविधान समजून घेताना, लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कलम ३७७ या विषयांवर सुद्धा चर्चा झाल्या. हे करत असतानाच आजूबाजूला जाणवणाऱ्या काही गंभीर गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन ऑनर किलिंग, ग्लोबल वार्मिंग यांसारख्या विषयांवर सुद्धा चर्चा झाल्या. कवितांची व गाण्यांची सहल घेऊन कधी आम्ही जीवदानी ला गेलो तर कधी बाईक रायडिंग व ट्रेकिंग करत अशेरीगड ला गेलो. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमाची सहल घेऊन नॅशनल पार्कला सुद्धा गेलो. या सहलीला तर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. काही पालक आवर्जून आपल्या मुलांना घेऊन या सहलीला आले होते, तर काही मुले-मुली आपल्या पालकांना मुद्दाम या सहलीला घेऊन आले होते. खरंतर हळूहळू मैत्री कट्टा सर्वांच्या मनात घर करत गेला आणि घरोघरी सुद्धा जाऊन पोहचला. यातूनच *मैत्री कट्टा घरोघरी* व *फिरता मैत्री कट्टा* या संकल्पना राबवल्या गेल्या. घरोघरी कट्ट्यामध्ये ज्या घरात कट्टा घ्यायचा आहे तिथे आवश्यक असणारा विषय घेण्यात येतो. त्यानिमित्ताने त्यांना हव्या असणाऱ्या विषयावर त्यांच्या घरात चर्चा घडवून आणता येते हा याचा एक उद्देश. आणि सोबतच त्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी मैत्री कट्ट्याच्या नावाने नेमके कुठे जातात हे त्यांच्या घरच्यांना कळू शकते व त्यांना विश्वास वाटू शकतो हा दुसरा उद्देश. फिरत्या कट्ट्यामुळे वेगवेगळ्या भागातील मित्र-मैत्रिणींना यात सहभागी करून घेता आले. कोणत्याही प्रकारचे बंधन नसणारा, कोणत्याही विषयाची ऍलर्जी नसणारा, चर्चेच्या शेवटी कोणत्याही एका तात्पर्य चा आग्रह नसणारा, सर्वांना बोलण्याची संधी देणारा, तसेच सर्वांना बोलतं करणारा, सर्वांना आपलं मन मोकळं करण्याची संधी असणारा आणि *’इथे कुणाचीही अक्कल काढली जात नाही, तर वाढवली जाते’* या टॅगलाईन सह काम करणारा हा कट्टा आज अनेकांचा जवळचा मित्र बनला आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. काल दि. २१ जुलै रोजी मैत्री कट्ट्याच्या वर्षपूर्ती निमित्ताने बोरीवली येथील नॅशनल पार्क येथे सहल आयोजित केली होती. या सहलीत आजपर्यंत कट्ट्याला येऊन गेलेल्या साथींसोबतच आजपर्यंत कधीच न आलेले साथी सुद्धा आमंत्रित होते. या सहलीत नॅशनल पार्क मध्ये मजा मस्तीची सफारी करण्यासोबतच मैत्री कट्ट्याचा मागच्या वर्षभराचा आढावा सुद्धा घेण्यात आला. या कट्ट्यामध्ये येऊन आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली म्हणून भावुक झालेल्या महिलांचा अनुभव, तसेच इथे येऊन बोलण्यातला विश्वास मिळाला असं सांगणाऱ्या तरुणांचा अनुभव सर्वांशी शेअर केला गेला. या वर्षभरात अमितच्या मेहनतीतून कट्ट्याला अनेक मित्र-मैत्रिणी जोडले गेले. आपल्या संपूर्ण कुटुंबाला कट्टयाशी जोडून घेणारा अमित एकमेव कार्यकर्ता ठरला. निशाच्या डोक्यातून निघणाऱ्या वेगवेगळ्या भन्नाट कल्पनांमुळे व तिच्या खेळकर स्वभावामुळे कट्ट्याला जिवंतपणा राहिला. मनोज आणि यश हे या वर्षभरात कट्ट्याचे भक्कम खांब बनून गेले. कुणी नसतानाही एकहाती कट्टा चालू ठेवण्याची जिद्द आणि कसब त्यांनी दाखवून दिली. निलम, सुमित आणि गौतम यांनी नेहमीच कट्ट्याचे वातावरण हलके फुलके ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवाय अधिक मित्र-मैत्रिणी कट्ट्यासोबत जोडण्याचाही त्यांनी सतत प्रयत्न केला. हरिश, प्रतिक, अमित सिंग, किरण, निलम, सुमित या सर्वांनी होळीची पोळी दान करण्याच्या उपक्रमात घेतलेली मेहनत व त्यानिमित्ताने अनेकांना या उपक्रमाशी जोडून घेण्याचे केलेले काम नेहमीच लक्षात राहण्याजोगे आहे. निलम-सुमित च्या घरी लग्न विषयावर झालेला कट्टा आणि गौतम च्या घरी पालकत्व विषयावर झालेला कट्टा हे दोन्हीही भन्नाट अनुभव राहिले. किरण-नंदा च्या घरी सुद्धा आता पुढचा कट्टा पेंडिंग आहे. किरण-नंदा सोबत त्यांचा छोटा आरुष सुद्धा कट्ट्याला जोडला गेला. कट्ट्याच्या सुरुवातीचे काही दिवस सोबत असणारा दिपक, ‘ज्याला मेंदू समजला त्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येणं सोपं असतं’ असं म्हणणारा श्रीकांत, बोलायची भीती वाटते असं म्हणत भरपूर बोलणारा साई, गार्डनमध्ये आमच्या गप्पा ऐकून कट्ट्याला जॉईन झालेला निखिल हे सगळे नेहमीच लक्षात राहतील. आशिष जी पुरुषभान या विषयावर बोलण्यासाठी नवी मुंबईतून दहिसरला आले. धीरज व प्रकाश हे चेंबूर व कल्याणहून आले. शितल कुर्ल्यावरून दरवेळी येते, तर तृप्ती मुंबई सेंट्रल वरून येते. हे सर्व मित्र-मैत्रिणी आमचं बळ अनेक पटींनी वाढवतात. दहिसरची प्रियंका, बोरीवलीची वर्षा, कांदिवलीचे शरद सर, बोरीवलीचे अमित सॅमियेल, गोरेगावचा समीर, मालाडची संगिता, गोराईच्या गीतांजली, होळीच्या उपक्रमातून कट्टयाशी जोडल्या गेलेल्या अनिशा ताई, दहिसरचा हर्षल, नवागावचा राजेश हे सगळे आता मैत्री कट्ट्याचे भाग झाले आहेत. कालच्या सहलीच्या निमित्ताने प्रथमच कट्ट्याला आलेले आशिषजींची जोडीदार ऍड. क्रांती व मुलगी शारिवा, वर्षाचा जोडीदार कृष्णा व मुलगी भूमी, अमितचा भाऊ महेश, यशचा मित्र कौस्तुभ व गणेश आणि रूपेश हे सुद्धा आता कट्ट्याला जोडून घेतीलच. सर्वांच्या साथीने आपण हा कट्टा अधिकाधिक मोठा करत नेऊ व मैत्रीचा हात सारखे राहिलेले उपक्रम अधिक उत्साहाने पुन्हा राबवायला सुरू करू. त्याचबरोबर अजूनही नवनवीन उपक्रम पुढेही आपण यात आणतच राहू. शेवटी मैत्री कट्टा हा आपला सर्वांचाच कट्टा आहे. सर्वजण मिळूनच तो पुढे नेवुयात आणि अधिकाधिक मित्र-मैत्रिणींना आपलं मन मोकळं करण्याची संधी देऊयात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here