एलईडी देखभाल करणारा ठेकेदार गेला पळून ; नगरसेवक यतीन खोत यांनी वेधले लक्ष

0
398

मालवण, ता. ३१ : शहरातील एलईडी पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. देखभाल करणारा ठेकेदारच पळून गेल्याने स्थानिक नगरसेवकांना सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरसेवकांनाच सध्या स्वखर्चातून पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक यतीन खोत यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली. खोत यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी श्री. जावडेकर यांनी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन ठेका काढा अशा सूचना प्रशासनास दिल्या.
मालवण नगरपरिषदेत नूतन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या जयंत जावडेकर यांचे नगरसेवकांच्यावतीने स्वागत करण्यात आले. शहरात एलईडी दिव्यांचा प्रश्‍न गंभीर बनला असून अनेक प्रभागात अंधार पसरला आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका घेतलेला ठेकेदार पळून गेल्याने पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. सध्या पावसाळी हंगाम असल्याने रात्रीच्यावेळी नागरिकांना काळोखात ये-जा करताना अनेक समस्या भासत आहेत. पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने स्थानिक नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. सध्या स्थानिक नगरसेवक स्वखर्चातूनच पथदिव्यांची दुरुस्ती करत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष पुरवून तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक खोत यांनी मुख्याधिकार्‍यांकडे केली. त्यानुसार श्री. जावडेकर यांनी तत्काळ याप्रश्‍नी एलईडी दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन ठेका काढण्याचे आदेश प्रशासनास दिले. शहरातील काही भागात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करणार्‍या ईएसएलच्या ठेकेदाराला बोलावून घेत कामातील दिरंगाईबाबत समज देण्यात आली. यावेळी शहरातील विविध समस्यांवरही मुख्याधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.