महेंद्र कदमचा मृतदेह सापडला

0
847

वैभववाडी : दि ११ : पुराच्या पाण्यात सोमवारी(ता.१२) वाहून घेतल्या उंबर्डे बौद्धवाडीतील महेंद्र धकला कदम(४६) याचा मृतदेह तिथवली-दिगशी येथे सापडला. करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक पथकाने राबविलेल्या शोध मोहिमेत पाचव्या दिवशी हा मृतदेह हाती लागला. सोमवारी रात्री महेंद्र कदम आणि काशिनाथ कदम हे काॅजवेवरुन घरी जात असताना पुरात वाहून गेले होते. त्यापैकी काशिनाथच्या हातात झाडाची फांदी मिळाल्यामुळे तो बचावला. मात्र महेंद्र वाहून गेला होता. सोमवारी रात्रीपासून स्थानिक ग्रामस्थांसह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्याचा शोध घेत होती.दरम्यान शनिवारी दुपारनंतर करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक पथकाने तहसीलदार रामदास झळके, सरपंच शेरपुद्दीन बोबडे आदींच्या उपस्थितीत नदीपात्रात शोध मोहीम सुरु केली होती. या पथकाला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दिगशी नजिक नदी पात्रालगत झुडपात अडकला महेंद्रचा मृतदेह आढळून आला. सह्याद्री जीवरक्षक पथकात विजय पवार, आनंद माळकर, राजेंद्र पवार, तुकाराम पवार, राजेंद्र वारंग, विजय सावंत, अमर शिंदे, संजय पवार, देवेंद्र पवार आदींचा समावेश होता. महेंद्रचा मृतदेह हाती लागल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.