रत्नागिरीत आपत्तीग्रस्त गावांमध्ये नुकसानीबाबत पंचनामे झाले नाहीत

0
352

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात पूरपरिस्थितीमुळे आणि वादळी वा-यासह झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ब-याचशा गावांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील हातिस, चांदेराई, सोमेश्वर, गावडेआंबेरे, हरचेरी या भागात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र या सर्व नुकसानग्रस्त गावांमध्ये तहसिल कार्यालयाती विस्तार अधिकारी पोचलेच नाहीत. पंचनामे झालेच नाहीत. शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही. अशी खंत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली. रविवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की 14 ऑगस्ट पासून शासकीय अधिका-यांच्यासमवेत कृषी व घरांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहे. सांगली, कोल्हापूर या भागात आपत्ती झाली. म्हणून रत्नागिरीकरांच्यावतीने मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ त्या जिल्ह्यांमध्ये जाऊ लागला. मात्र असाच मदतीचा ओघ रत्नागिरी तालुक्यात देखील होणे अपेक्षीत होते. मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. रत्नागिरीतील शिवसेनेच्या वतीने जास्त बाधित कुटुंबियांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच अन्य उपजिवीकेसाठी आवश्यक त्या वस्तू स्वरुपात मदत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपत्ती ओढवली. त्यामुळे रत्नागिरीचा राजा मंडळाच्यावतीने पन्नास हजार लिटरच्या मिनरल वाॅटरच्या बाटल्या मदत म्हणून पाठवण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात आपत्तीमुळे जिवीत व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दही हंडी उत्सव, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करुन त्यासाठी जमा करण्यात येणारी रक्कम आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येईल अशीही माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली आहे.

 

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.