जिल्ह्यात होणार पेपरलेस आर्थिक गणना

0
228

सिंधुदुर्गनगरी : दि. २९ :  देशात होणाऱ्या राष्ट्रव्यापी ७ व्या आर्थिक गणनेमध्ये सर्व  उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंब, उद्योग यांना भेट देऊन करण्यात येणार आहे. सदर गणनेचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडून नेमण्यात आलेल्या प्रगणकांकडून केले जाणार आहे. यागणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या अनुषंगाने नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अभिजीत कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अँथोनी थॉमस, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक परशुराम गावडे, नगर प्रशासन अधिकारी संतोष जिरगे, विशेष निमंत्रीक सदस्य डॉ. काकडे व प्रा. सुरवसे, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगर पालिका, पंचायत तसेच ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांनी आर्थिक गणनेच्या कामी कॉमन सर्विस सेंटर यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले. तसेच पगणकांची नियुक्ती व त्यांचे प्रशिक्षण लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कॉमन सर्विस सेंटरच्या जिल्हा व्यवस्थापकांना केल्या. जिल्हा साख्यिंकी अधिकारी यांनी सांगितले की, प्रथमच मोबाईल ॲपद्वारे आर्थिक गणना होत आहे. आर्थिक गणनेच्या क्षेत्रकामासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर यांचेकडून नेमण्यात आलेले प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंब, उद्योग यांना भेट देऊन सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना करणार आहेत. यावेळी कॉमन सर्व्हिस सेंटर, जिल्हा व्यवस्थापक प्रसाद जाधव यांनी आर्थिक गणना कशआ प्रकारे राबविण्यात येणार आहे याचे सादरीकरण केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.