गणेशोत्सव व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या गुणवत्ता नियंत्रण कक्ष पथकाकडून कोकण परिमंडळाची पाहणी

0
384
रत्नागिरी : दि.०४ : कोकण परिमंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणची यंत्रणा प्रभावित झाली होती. तरी या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने कमीत कमी कालावधीत पूर्ववत केला होता. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या गणेशोत्सव काळात ग्राहकांना अखंड वीजपुरवठा देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळाच्या वीज यंत्रणेची पाहणी कोकण प्रादेशिक विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण कक्षाच्या टीमकडून करण्यात आली. याचबरोबर मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिमंडळात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा.पालकमंत्री दीपक केसरकर व रत्नागिरी जिल्ह्याचे मा.पालकमंत्री रविंद्र वायकर तसेच दोन्ही जिल्ह्यातील मा.लोकप्रतिनिधी यांच्याशी मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी संवाद साधला व महावितरणकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांच्या आदेशाने हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या भेटी दरम्यान कोकण परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, रत्नागिरी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेटकर व सिंधुदुर्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी कोकण परिमंडळा अंतर्गत दोडामार्ग, बांदा, चांदुराई व लोटे परशुराम एमआयडीसी  येथील वीज यंत्रणेची पाहणी केली. तसेच विविध प्रकल्पांची पाहणी करताना मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. गणेशोत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शाखा कार्यालयांना दिलेल्या सर्व साहित्याची पाहणी केली. आवश्यक असल्यास अधिकचे साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. प्रकल्पांची पाहणी करताना आढळलेल्या त्रुटी निदर्शनास आणून देऊन त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या. दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प आदी योजनांच्या अंतर्गत सुरू असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंत्राटदारांच्या अडचणी समजावून घेत त्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन अंकुश नाळे यांनी दिले आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.