कोंडुरे सरपंचांवरचा अविश्वास ठराव नामंजूर…!

0
626

सावंतवाडी : दि. ११ : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे सरपंच सचला केरकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आवश्यक मतदानाचा आकडा पूर्ण न झाल्याने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी नामंजूर करत फेटाळून लावला. ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे मध्ये ११ सदस्यां पैकी सरपंचासह ९ सदस्य शिवसेनेचे होते. मात्र, आत्ताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरपंच सचला केरकर यांनी आपल्या पतीसह शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला होता. यामुळे मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत मध्ये सेनेकडे बहुमत असूनही सरपंच भाजप गेले होते. तसेच सरपंच इतर सदस्याना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात असा सूर ही इतर सदस्यांतून व्यक्त केला जात होता. यामुळे अखेर सरपंच सचला केरकर यांच्यावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यामुळे अविश्वास ठरावा साठी तहसीलदार म्हात्रे यांनी विशेष सभा सोमवार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी ११ सदस्यांपैकी दोन सदस्य गैरहजर असल्याने त्यांची नावे पुकारून ते दोन सदस्य गैरहजर असल्याची अधिकृत घोषणा म्हात्रे यांन केली. यानंतर अविश्वास ठरावावर हात उंचावून मतदान केले असता तर सरपंच सचला केरकर या तटस्थ राहिल्या तर इतर उपस्थित ८ सदस्यांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ९ सदस्यांची मते आवश्यक असल्याने ठरावाच्या बाजूने ८  मते पडल्याने ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक ती मते पूर्ण न झाल्याने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी अविश्वास ठराव नामंजूर जाहीर म्हणून घोषित करत आता पुन्हा १ वर्ष अविश्वास ठराव दाखल करता येणार नाही असे सांगितले. यावेळी ग्रामसेवक तोरसकर, उपसरपंच दिलीप मुळीक, नंदू नाईक, अर्जुन मुळीक, भगवान मुळीक, प्रकाश पार्सेकर, स्वाती सातार्डेकर, सुधीती मुळीक, दीपिका मुळीक उपस्थित होते. यानंतर भाजप तालुका अध्यक्ष महेश सारंग यांनी सरपंच सचला केरकर यांचे अभिनंदन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.