जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनवरून बांदा ग्रामस्थ आक्रमक

0
323

बांदा, दि.१४ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या हेदूस (ता. दोडामार्ग) ते वेंगुर्ले पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या जोमात आहे. शेर्ले नदीपासूनच हे काम होणे अपेक्षित असताना शेर्ले-मडूरा सीमेलगत अर्ध्यावरच बुधवारपासून पाईपलाईनचे काम सुरु झाले होते. बांदा हायवेवरुन कापईवाडीमार्गे पाईपलाईन नेण्याचा संबंधित विभागाचा डाव असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. त्यामुळे हे काम रोखण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारी शेर्ले ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जगन्नाथ धुरी यांनी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवी आमडोसकर, ग्रा. पं. सदस्य आनंद मेस्त्री, अनघा कळंगुटकर, सौ. कुडव, भिकाजी धुरी, सुरेश धुरी, आना धुरी, लवू सावळ, पोलीस पाटील विश्राम जाधव, देविदास सातार्डेकर, नवसो धुरी, तात्या पावसकर, रामा धुरी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीमध्ये जीवन प्राधिकरण विभागाचा मुळ आराखड्यात बदल करण्याचा डाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी अक्रम खान यांनी मुळ आराखड्यानुसार तेरेखोल नदीत फुटब्रीज प्रस्तावित असल्याचे स्पष्ट केले. शेर्ले-बांदा आळवाडा जोडणार्‍या पूलाची मागणी कित्येक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, तुळसाण व आरोसबाग येथे पूल झाल्याने हा पूल तांत्रिकदृष्ट्या होणे अशक्य आहे. वेंगुर्लेत जाणारी पाईपलाईन आळवाडामार्गे नेल्यास तेरेखोल नदीत फुटब्रीज उभारले जाईल. त्यामुळे शेर्ले, मडूरा दशक्रोशीची बांदा शहराकडे येण्याची समस्या आपोआपच संपुष्टात येईल असे स्पष्ट केले. यावेळी शाखा अभियंता योगेश नंदप्पा यांनी सदरची पाईपलाईन आळवाडा मार्गे शेर्ले बाजारवाडीतूनच होणार असल्याचे सांगितले. तेरेखोल नदीवर अडीज मीटर रूंदीचा पूल होणार असून त्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी मिळाली आहे. बांदा नदीपासून २४ केजीचे पाईप आवश्यक आहेत. सदर पाईप उपलब्ध नसल्याने शेर्ले गावात अर्ध्यावरुन सुरूवात केल्याचे स्पष्ट केले. १ डिसेंबर पासून बांदा नदीपात्राकडून कामाला सुरूवात होईल असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच अक्रम खान यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. तेरेखोल नदीवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष पूलाच्या कामाला सुरूवात करण्याचे आश्वासन अभियंता नंदप्पा यांनी दिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.