भिडे गुरुजींची जीभ पुन्हा घसरली…!

0
377

पुणे : दि. २६ : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावेळेस त्यांनी थेट गरोदर स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलं नसणाऱ्या स्त्रियांचा आक्षेपार्ह शब्द वापरत भिडे यांनी उल्लेख केला आहे. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना भिडे यांनी “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असं वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये भिडे नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलत होते. यावेळी त्यांना गरोदर स्त्रियांचा अपमान करणारे वक्तव्य केले. “जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे,” असं भिडे म्हणाले. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज नपुंसक आहे असं म्हणताच भिडे यांनी मुस्लीमांकडून राष्ट्रवादीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे असंही भिडे म्हणाले. “राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडणारा आहे. असं असतानाही काहीजण याबद्दल संभ्रम पसरवताना दिसत आहेत,” असं भिडे म्हणाले. पुण्यामध्ये भिडे यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल आपली भूमिक स्पष्ट केली होती. “सध्याच्या घडीला जी माणसं स्वतःला शिकलेली म्हणवतात तीच माणसं या कायद्याच्या बाबतीत अनेकांची दिशाभूल करत आहेत. मुस्लीम समाजही आपल्या देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यातही राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. मुळात हिंदूंमध्येच राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे तर मुस्लीम समाजाकडून अपेक्षा काय ठेवायची?,” असाही प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता. त्याआधी मागील आठवड्यामध्येही भिडेंनी “सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत,” असं वक्तव्य केलं होतं. स्त्रियांबद्दल बोलताना भिडेंनी तोल सोडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारची विधाने केली आहेत. मागील वर्षी नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी “माझ्या शेतातला आंबा खाणाऱ्या जोडप्याला आपत्यप्राप्ती होते. १८० जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून त्यापैकी दीडशे जोडप्यांना आपत्यप्राप्ती झाली आहे,” असा दवा त्यांनी केला होता. याचबरोबर इस्रोची चांद्रयान २ मोहिमेला अपयश आले तेव्हा अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here